Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-७-

टिळकांचें राष्ट्रीय अर्थशास्त्र


 लो. टिळकांच्या आर्थिक धोरणाचा व तत्त्वांचा आता विचार करावयाचा आहे. त्यांतील एका सिद्धान्ताचा मागल्या एका प्रकरणांत आपण विचार केला. इंग्रज सरकार या देशाचा रक्तशोष करीत आहे, लूट करीत आहे, येथला व्यापार व उद्योग नष्ट करून त्याला आपला व्यापार व उद्योग वाढवावयाचा आहे, आणि म्हणन नाना प्रकारचे जुलमी कायदे करून तें सरकार आमचे सर्व उद्योगधंदे ठार: मारीत आहे, हा टिळकांचा पहिला सिद्धान्त होता; आणि या औद्योगिक पारतंत्र्यातून आपण स्वराज्य प्राप्त झाल्यावांचून मुक्त होणार नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यांच्या सर्वं राजनीति शास्त्राचा हा पाया होता.
दुहेरी मार्ग
 या नीतिशास्त्राचें प्रतिपादन करतांनाच एका बाजूला आपल्या उद्योगधंद्यांचा, कारागिरीचा, व्यापाराचा व शेतीचा विकास झाला पाहिजे, असें ते सांगत; आणि या विकसित होणाऱ्या उद्योगधंद्यांच्या संरक्षणासाठी आपण स्वदेशी बहिष्काराचा अवलंब केला पाहिजे, असें दुसऱ्या बाजूने सांगत. औद्योगिक पारतंत्र्य नष्ट करावयाचें; आणि स्वराज्यप्राप्ति करून घ्यावयाची यासाठी हा दुहेरी मार्ग त्यांनी दाखवून दिला होता. किंवा या एकाच मार्गाच्या दोन बाजू होत्या, असेंहि म्हटलें तरी चालेल.
आक्षेप
 या मार्गाचे स्वरूप वर्णितांना त्यांनी हिंदी भांडवलदारांचा पक्ष घेऊन, ब्रिटिश भांडवलदारांवर, मँचेस्टरच्या गिरणीवाल्यांवर अनेक वेळा टीका केली. मॅचेस्टरवाले त्यांच्या मालावरची जकात हिंदुस्थान सरकारकडून कमी करून घेत, येथल्या