संघशक्तीची उपासना । २७९
मवाळांचा अस्त
पण या उदात्ततेचा कांही उपयोग झाला नाही. कारण ब्रिटिश सरकारला विरोध करणें, त्याच्या विरुद्ध प्रतिकाराची मोहीम उघडणें हें मवाळांना स्वप्नांतह मान्य होण्याजोगें नव्हतें. त्या वेळीं नव्हतें आणि पुढेहि केव्हा मान्य झालें नसतें. लो. टिळक मंडालेहून सुटून आल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी राष्ट्रीय पक्षाचें वर्चस्वं तेथे प्रस्थापित केलें. त्या वेळी त्यांनी होमरूलची चळवळहि सुरू केली होती. त्या वेळी श्रीनिवास शास्त्री, सुब्रह्मण्य अय्यर अशा कांही नेमस्तांनी तिला कांही काळ पाठिंबा दिला. पण लढा, संघर्ष, प्रतिकार, त्याग, आत्मार्पण, हा विचार त्यांना झेपण्याजोगा नव्हता. आणि टिळकांच्या चळवळीचा तोच आत्मा होता. त्यामुळे १९१७ नंतर नेमस्त नेते लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडले व अस्त पावले.
यांत सर्वांत दुःखद कथा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची आहे. वास्तविक कायदे- भंगाच्या चळवळीस त्यांनीच प्रारंभ केला होता; पण १९२५ साली लिहिलेल्या आत्मचरित्रांत, "आम्ही सनदशीर मार्ग सोडून रेसभरहि कधी गेलो नाही", असें म्हणून त्यांनी बहिष्कारयोगाचा निषेध केला. आणि "ब्रिटिशांचे मन आता उदार झालें आहे, तेव्हा सनदशीर मार्ग सोडून रेखामात्रहि तुम्ही जाऊं नका", असा आपल्या देशबांधवांना त्यांनी अखेरचा संदेश दिला.
काँग्रेस अभंग
मवाळांशी तडजोड होऊन १९०७ साली काँग्रेस अभंग राहिली असती तरी, हळूहळू टिळकांनी राष्ट्रीय पक्षाचा प्रभाव तेथे प्रस्थापित करून बहुमताच्या जोरावर राष्ट्रीय सभेला (काँग्रेसला) बहिष्कारयोगाच्या मार्गावर निश्चितच आणली असती. आणि तेंच त्यांनी १९१६ साली केलें. त्या वेळीं प्रथम काँग्रेसच्या मवाळांनी ठरविलेल्या प्रतिज्ञाप्रत्रकावर सही करून त्यांनी आंत प्रवेश केला, आणि मग आपलें बहुमत करून काँग्रेसलांच होमरूलच्या चळवळींत ओढले. हा खटाटोप यासाठीच होता की, काँग्रेस फुटू नये. सर्व देशाची ही एकमेवाद्वितीय संस्था होती. ती अभंग राखली पाहिजे अशी टिळकांची प्रतिज्ञा होती. कारण लोकमत कितीहि जागृत झालें तरी तें जोपर्यंत संघटित होत नाही तोंपर्यंत तें सरकारला विरोध करण्याइतकें समर्थ होऊं शकत नाही हें त्यांना दिसतच होतें. त्यामुळे १९०७ सालीं व पुन्हा १९१५ साली आपली निराळी काँग्रेस काढावी असा राष्ट्रीय पक्षांतील त्यांच्या अनुयायांचा आग्रह असूनहि तो त्यांनी मानला नाही व काँग्रसचें अद्वितीयत्व कायम राखलें.
कारण काँग्रेस ही इंग्लिश पार्लमेंटसारखी आहे, असें त्यांचें मत होतें, त्या पार्लमेंटांत अनेक पक्ष असतात. कधी या पक्षाचें बहुमत होतें कधी त्या पक्षांचें; पण त्यामुळे पार्लमेंट कोणी सोडून देत नाही. तीच दृष्टि काँग्रेसविषयी ठेवून आपण ती संस्था रक्षिली पाहिजे, असें त्यांचे ठाम धोरण होतें, आणि तें शेवटपर्यंत संभाळून त्यांनी काँग्रेसचा संभाळ केला. आज भारताला जें वैभव प्राप्त झाले आहे, जगांतल्या