Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघशक्तीची उपासना । २७७

आणि बहिष्कार या जहाल मार्गाने टिळक राष्ट्रीय सभेला नेऊ लागले. तेव्हा जहाल व मवाळ हे दोन तट पडणें अपरिहार्य झालें.
वंगभंगाच्या वेळीं
 वंगभंगाच्या चळवळींतून या दोन पक्षांच्या वृत्ति, कार्यपद्धति व राष्ट्रीय चळवळीविषयीची धोरणें स्पष्ट झाली. बंगालच्या फाळणीविरुद्ध लोकमत जागृत करण्यासाठीच स्वदेशी व बहिष्कार ही चळवळ सुरू झाली. यांत एक लक्षणीय गोष्ट अशी की, प्रारंभी ना. गोखले, सुरेंद्रनाथ हे नेमस्त म्हणजे मवाळ पुढारी या चळवळीला अनुकूल होते. सुरेंद्रनाथांनी तर तिचें नेतृत्वच केलें. बनारसच्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावरून गोखले यांनी या चळवळीचें उत्तम समर्थन केलें. "ही चळवळ राष्ट्राच्या इतिहासाला वेगळेंच स्वरूप देणारी अशी गोष्ट होय. या चळवळीने देशांतील वाद हटून पूर्वी कधी झाली नव्हती इतकी एकी पुढाऱ्यांत झाली आहे." असे उद्गार त्यांनी काढले. "बंगाली लोकांच्या मागे आम्ही उभे आहोंत, बहिष्कार हें शस्त्र योग्य असून स्वदेशीकरिता लोकांनी झीज सोसली पाहिजे, हिंदुस्थानाला वसाहतीचें स्वराज्य मिळालें पाहिजे.' असेंहि त्यांनी भाषणांत सांगितलें. याचा अर्थ असा की, गोखले जहाल झाले! "टाइम्स ऑफ इंडिया' ने दुसऱ्या दिवशीं तशी टीका केलीच. "नेमस्तपणा गोखले यांनी सोडला ही त्यांनी चूक केली" असें तो म्हणाला. दुर्देव असें की, सर्व नेमस्ताग्रणींना ही चूक झाली असेंच वाटले; आणि ती दुरुस्त करण्याच्या प्रयत्नास त्यांनी लगेच प्रारंभ केला.
जीव गुदमरला
 वास्तविक वंगभंगामुळे सर्व देशांत व विशेषतः बंगालमध्ये जो सरकारविरुद्ध प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला होता त्याच्या लाटेंत सर्व प्रांतांच्या, पंथांच्या, धर्मांच्या लोकांना एकत्र स्नान घडवून सर्वांना राष्ट्रीयत्वाचा मंत्र देण्याचा व अशा रीतीने सर्व भेद नष्ट करून दृढ एकात्मता घडविण्याचा टिळकांचा उद्देश होता. स्वदेशी व बहिष्काराची चळवळ त्यांनी नव्या जोमाने प्रचलित केली ती याच हेतूने. आरंभी तो हेतु साध्य होत आला होता. ना. गोखले यांनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावरून चळवळीला पाठिंबा दिला. सुरेंद्रनाथांनी तिचें प्रत्यक्ष नेतृत्वच केलें; पण त्या महासागरांतील प्रचंड लाटांचें खारे पाणी नाकातोंडांत जातांच नेमस्तांचा जीव गुदमरला आणि ते भराभर बाहेर पडूं लागले, राष्ट्रीय सभेलाहि या लाटेंतून मागे खेचण्याचा त्यांनी निश्चय केला होता. त्यासाठी टिळक व लजपतराय यांना पुढच्या सालच्या कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष न करतां त्यांनी दादाभाईंना पाचारण केलें; पण दादाभाईंनीच त्यांना दगा दिला. त्यांनी स्वदेशी-बहिष्काराचें समर्थन तर केलेच, पण शिवाय स्वराज्य-मंत्राची दीक्षा दिली. यामुळे राष्ट्रीय सभा एकदम 'केसरी'च्या म्हणजे 'जहालां'च्या हातीं गेली. कलकत्त्याच्या इंग्लिशमन पत्राने म्हणून टाकलें, "यंदाची राष्ट्रीय सभा सर्वतोपरी जहाल पक्षाच्या हाती गेली