२७६ । केसरीची त्रिमूर्ति
दळणवळणाची रेल्वेसारखीं साधनें, अशी एकराष्ट्रीयत्वाची पूर्वतयारी सगळी झाली हें खरें; पण सर्वांचा एकजीव होण्यास लोकांचीं मनें एक झाली पाहिजेत; ही उणीव भरून काढणें हा राष्ट्रीय सभेचा मूळ हेतु आहे. हा साध्य होण्यासाठी हिंदुस्थानांतील सर्व जातींच्या, धर्मांच्या व सर्व प्रांतांतल्या लोकांस एकदिलाचें व एकविचाराचें करणें हें राष्ट्रीय सभेचें मुख्य कर्तव्य होय; आणि आज दहा वर्षे जो क्रम चालत आहे तो तसाच आणखी कांही वर्षे चालू राहिल्यास हा हेतु बऱ्याच अंशाने तडीस जाईल अशी राष्ट्रसभेच्या पुरस्कर्त्यांची उमेद आहे."
रयतेला येऊ द्या
राष्ट्रीय एकतेची जशी टिळकांना चिंता होती तशीच जनतेच्या जागृतीचीहि होती. त्यामुळे शेतकरी, कारागीर हे लोक आता राष्ट्रीय सभेत आले पाहिजेत, असें प्रतिपादन आठव्या-नवव्या अधिवेशनापासून ते जास्त आग्रहाने करूं लागले. सातारा, कराची अशा ठिकाणीं जेव्हा राष्ट्रीय सभेचीं प्रांतिक अधिवेशने भरत तेव्हा त्यांचें महत्त्व सांगतांना ते हा विचार मुद्दाम सांगत. लोकजागृतीच्या दृष्टीने प्रांतिक सभेचें महत्त्व त्यांना जास्त वाटे. सातारकरांना मार्गदर्शन करतांना त्यांनी म्हटलें आहे की, "त्यांनी पुढील साली कांही तरी विशेष गोष्ट करावी; आणि ती कोणती म्हणाल तर शेतकरी वगैरे लोकांत प्रांतिक सभेबद्दल जागृति उत्पन्न करणें ही होय.. जमिनीचा धारा, जंगल, मीठ, अबकारी वगैरे बाबतींत गरीब रयतेचे हक्क काय आहेत ते त्या रयतेस समजून देण्याच्या उद्योगास आम्ही लागलें पाहिजे... रयतेचीं दुःखें रयतेनेच येऊन सभेत सांगितली पाहिजेत. निदान ज्यांच्या दुःखाबद्दल सरकारपाशी आम्ही दाद मागतों ते लोक असल्या सभेस हजर तरी असले पाहिजेत." (केसरी, १२ मे १८९६).
जहाल- मवाळ भेद
लोकजागृतीचा– शेतकरी, कारागीर, तेली, तांबोळी, कोष्टी, साळी, माळी, चांभार, महार ह्यांना आपले हक्क समजावून देऊन त्यांच्यांत प्रतिकारशक्ति निर्माण करण्याचा- टिळकांचा हा जो आग्रह त्यामुळेच मवाळ व जहाल हे दोन पक्ष निर्माण झाले. कारण वर्षांतून चार दिवस एकत्र जमावें, भाषणे करावीं, कायदे-कौन्सिलाचें सभासदत्व, सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा यांविषयी कांही मागण्या कराव्या आणि वर्षभर नंतर आराम करावा, अशीच मवाळांची राष्ट्रीय सभेची कल्पना होती. तन-मन-धन अर्पण करून लोकजागृति करावयाची आहे, हें कोणाच्या स्वप्नांतहि नव्हतें. अलाहाबादच्या 'इंडियन ओपिनियन' पत्राने हें स्पष्टपणें म्हटलें आहे की, हिंदुस्थानांत राजकीय चळवळीला यश न येण्याचें कारण हेंच की, पुढारी अंग मोडून मेहनत करीत नाहीत. सर्व वेळ काँग्रेसला देण्यास कोणीच तयार नव्हतें. उलट जे आरंभी स्वतंत्र होते त्यांनी- तेलंग, चंदावरकर, तय्यबजी, सुब्रह्मण्य अय्यर, शंकरन् नायर यांनी- सरकारी नोकऱ्या पतकरल्या. उलट दुष्काळांतील साराबंदी, स्वदेशी