Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-६-

संघशक्तीची उपासना


संघटित सामर्थ्य
 लो. टिळकांना भारतांत लोकसत्ता स्थापावयाची होती; आणि म्हणूनच त्यांना स्वराज्य मिळवावयाचें होतें तें लोकशक्तीच्या बळावर, व त्या शक्तीच्या साह्याने मिळवावयाचें होतें. असें उद्दिष्ट सतत डोळ्यापुढे असल्यामुळेच त्यांनी प्रारंभापासून ही लोकशक्ति जागृत करण्याचे प्रयत्न चालविले होते; पण लोकशक्ति जागृत करणें जितकें अवश्य तितकेंच तो संघटित करणें हेंहि अवश्य असतें, त्यावांचून सर्व प्रयत्न फोल ठरतात, हें लोकसत्तेचें तत्त्वहि त्यांनी जाणलें होतें. आणि म्हणून प्रारंभापासून त्यांनी संघशक्तीची उपासनाहि तितक्याच निष्ठेने चालविली होती.
मर्मस्थान
 प्राचीन काळी ग्रीसमध्ये अथेन्स या नगरींत लोकसत्ता स्थापन झाली होती. तिचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे; पण ती लोकसत्ता दीर्घकाल टिकली नाही. कारण अथीनियन लोकांना अभंग असें ऐक्य टिकवितां आलें नाही. लोकसत्तेचें हेंच मर्मस्थान आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य द्यावयाचें आणि तरीहि एकजूट कायम राखावयाची, हें कार्य फार अवघड आहे. जवळ जवळ अशक्य आहे. रोमनांनीहि लोकसत्तेशीं कांही काळ चाळा केला; पण त्यांनाहि लवकरच अनियंत्रित सम्राटांचाच आश्रय करावा लागला. आजपर्यंत दीर्घकालपर्यंत, व्यक्तिस्वातंत्र्य देऊनहि, अभंग ऐक्य टिकविण्यांत जगांत फक्त इंग्लंडला यश आलेले आहे. त्याच्या खालोखाल अमेरिकेला. बाकी पश्चिम युरोपांतील इटली, जर्मनी, फ्रान्स, स्पेन ह्या देशांतील लोकशाहीची कथा ही रडकथाच आहे. त्याचें कारण एकच. ह्या देशांतील
 के. त्रि. १८