२७४ । केसरीची त्रिमूर्ति
लोकांना व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकसत्ता यांचा समन्वय साधण्याची कला अवगत झालेली नाही.
जागृति व संघशक्ति
हा सर्व इतिहास टिळकांच्या डोळ्यासमोर होता. म्हणून ही समन्वय विद्या हिंदी जनतेला पढविण्याचे त्यांनी यावत्शक्य प्रयत्न केले. 'जागृति आणि संघटना, जागृति आणि संघटना' हाच त्यांचा मंत्र होता. १९०२ च्या जानेवारीत केसरीचा एकविसावा वाढदिवस होता. त्या वेळीं एका लेखांत टिळकांनी म्हटले आहे की, "लोकांत जागृति, व संघशक्ति उत्पन्न करणें हेंच वर्तमानपत्रकार या दृष्टीने आमचें मुख्य कर्तव्य आम्ही समजतों." सतत चाळीस वर्षे हेंच कार्य करीत राहिल्यामुळे टिळकांना हिंदुस्थानांत लोकशाहीचा पाया घालतां आला. ते भारतांतील लोकसत्तेचे आद्य प्रणेते ठरतात तें त्यांच्या या असामान्य कार्यामुळेच.
जुटीच्या अभावीं
केसरीच्या दुसऱ्या वर्षीच टिळकांनी 'जूट' या विषयावर चार लेख लिहून संघशक्तीचें महत्त्व विशद केले आहे. "आम्हांवर पारतंत्र्यासारखी विपत्ति आली, व इतर अनेक अरिष्टें कोसळलीं त्याचें कारण जुटीचा व स्वाभिमानाचा अभाव हें होय; आणि यापुढे आम्हांत खरी जूट झाली तरच आपल्याला स्वतंत्रता-मंडित देशाचें जूं खांद्यावर घेतां येईल, आणि हिंदु म्हणजे तृण भक्षण न करणारे दोन पायांचे पशु, अशी जी कित्येक पाश्चात्त्यांची समजूत झाली आहे ती दूर होऊन हे भारतवर्षीय आपल्या बरोबरीचे, किंबहुना काडीभर जास्तच आहेत अशी त्यांची पक्की खात्री होईल." असे विचार पहिल्या दोन लेखांत त्यांनी मांडले आहेत; आणि पुढे जॉन राजापासून इंग्लंडच्या इतिहासाचा मागोवा घेऊन इंग्लिशांना जें असामान्य वैभव प्राप्त झालें तें जुटीमुळेच होय, असें सांगितलें आहे. ते म्हणतात, "त्यांच्यांत तंटे असतात, भांडणें असतात, पण राज्य-प्रकरणी ते सर्व आपसांतील तंटे गिळून टाकून जुटीने काम चालवितात. देशाच्या व सार्वजनिक कामांत सर्व एक. पण आमच्या इकडे नजर टाकली तर सर्व त्याच्या उलट प्रकार!"
एकजूट, संघटना, राष्ट्रीय एकात्मता यांचें असें अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळेच टिळकांनी काँग्रेस स्थापन झाल्यापासून, एखाद्या पित्याने आपल्या कन्येचें लालनपालन, भरण-पोषण करावें तसें, पस्तीस वर्षे, काँग्रेसचें, राष्ट्रीय सभेचें भरण-पोषण केलें. राष्ट्रीय सभेवांचून हिंदुस्थानला अन्यगति नाही हाच विचार ते लोकांना अखेरपर्यंत सांगत राहिले होते.
राष्ट्र-मण्यांची माला
१८८५ साली पहिली कांग्रेस पुण्याला भरावयाची होती. तेव्हा या कल्पनेचें स्वागत करतांना टिळकांनी म्हटले की, पुण्यास लवकरच एक जंगी कॉन्फरन्स म्हणजे सभा होणार आहे. तिचा हेतु असा आहे की, सरकारपासून जे हक्क घ्यावयाचे