स्वराज्याचें राजनीतिशास्त्र । २७१
"गुरें फॉरेस्टांत गेली म्हणून त्यांना कोंडणारे आम्ही, पाटील आम्ही, कुळकर्णी आम्ही, मामलेदार व इतर अधिकारी आम्ही. आणि इंग्रजांसाठी लढतोहि आम्हीच. तुम्हीच राज्य चालवीत आहा. आपल्या हातांतच स्वराज्य आहे. हें कळावयाचें व तें हातांतल्या हातांत ठेवावयाचें, एवढेच काय तें.", "तुम्ही इंग्रज सरकारचें राज्य आपण होऊन चालवीत आहां. तुमच्या हातूनच जुलूम करण्याची हातोटी सरकारास साधली आहे. याकरिता ज्या वेळीं तुम्ही एकजुटीने प्रयत्न कराल त्या वेळी हें राज्य तुमचेंच आहे.", "कोणी विचारतील की, मग काय, आम्हीं बंड करावयाचें की काय? बंडहि करायला नको व स्वस्थहि बसायला नको. हें माझें यास उत्तर आहे. पोलिस कोण आहेत? मुनसफ कोण असतात? मामलेदार कोण असतात? सगळे तुमचेच लोक. असें जर आहे तर सरकारला आपल्या मनासारखें करायला कां लावतां येणार नाही?"
बहिष्काराचा हा अर्थ आहे. महात्माजींनी पुढे जी चळवळ केली तिच्यांतील करबंदी, कायदेभंग, सत्याग्रह व असहकारिता हीं जीं तत्त्वें तीं सर्व या बहिष्कारयोगांत आलेली आहेत. १९०८ साली टिळकांना शिक्षा झाली नसती तर ती चळवळ तेव्हाच झाली असती.
तुरुंग, हद्दपारी
हीं बहिष्कारयोगाची तत्त्वें झालीं; पण नुसत्या तत्त्वप्रसारांनी कार्य होत नसतें. नुसता युक्तिवाद उपयोगी पडत नाही. मवाळपक्षाचे लोक पंचवीस वर्षे तो करीतच होते; पण सरकारवर त्याचा कसलाहि परिणाम होत नव्हता. म्हणूनच टिळकांनी नवा पक्ष स्थापिला. ह्या तत्त्वांच्या मागे सामर्थ्य उभे केलें पाहिजे हें ते प्रत्येक व्याख्यानांत सांगत असत. तें सामर्थ्य कोणते? देशासाठी हालअपेष्टा सोसण्यास सिद्ध असलेली तरुण शक्ति, आत्मबलिदान करण्याचें धैर्य जिच्या ठायीं आहे अशी लोकशक्ति! दडपशाहीच्या राजनीतीला या राजनीतीने उत्तर देणें अवश्य होतें. टिळक म्हणतात, "देशासाठी अनेक संकटे सोसण्यास आम्ही तयार असलें पाहिजे. रक्तपातशून्य क्रांति हे शब्द आहेत. रणांगणावरील रक्तपाताचा त्यांत समावेश नसला तरी तुरुंग किंवा हद्दपारीची शिक्षा त्यांत येत नाही, असें समजूं नका." (व्याख्यानें, पृ. ५). "ज्या गोष्टी आहेत त्यांची नुसती तात्त्विक समज असून भागत नाही. इच्छेचे मज्जातंतु हातांच्या बोटांत उतरले पाहिजेत. घोटाळा माजला आहे तो काढून टाकण्याकरिता धस सोसावी लागेल. हद्दपार व्हावें लागेल, तुरुंगांत जावें लागेल, तरी तुम्हीं तयार असलें पाहिजे. संकटांनीच तुमचा कस लागणार आहे. तुमचा कस कांही भोजनाच्या ताटावर लागावयाचा नाही." (व्याख्यानें, पृ. ४५). "सरकारने काही केलें तरी स्वदेशी व बहिष्काराचें व्रत आम्ही पुढे चालविणार असा निश्चय पाहिजे. मला तुरुंगांत पाठविलें किंवा फाशी दिलें तरी बेहत्तर, असें सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नुकतेच जाहीर केलें आहे. शेकडो लोक कैदेत गेले आहेत,