२७० । केसरीची त्रिमूर्ति
देत नाही, हें मनुष्यस्वभावास धरूनच आहे. त्यांचे वैभव कमी होईल असा उद्योग ते आम्हांस शिकवितील हें दुर्घट आहे; पण आमच्या हितासाठी आम्हीं उद्योग केला पाहिजे. त्यासाठी स्वदेशी हा मार्ग आहे. स्वदेशी हें ढोंग नव्हे. ज्या देशांतील अन्नाने आमचा पिंड बनला तो देश काय ढोंग आहे? आर्यभूमि वाट पाहत आहे. तिला मातापिता म्हणून केव्हा ओळखाल याची ती वाट पाहत आहे."
गुर्लहोसूर येथील व्याख्यानांत त्यांनी सांगितलें की, "स्वदेशी व स्वराज्य कांही भिन्न नाहीत. स्वदेशीचें अंतिम स्वरूप स्वराज्य हें आहे." यावरून स्वदेशाची चिंता वाहणें त्यासाठी वाटेल त्या त्यागाची सिद्धता करणें हा 'स्वदेशी'चा टिळकांचा अभिप्रेत अर्थ होता हें स्पष्ट होईल. वरील अकोल्याच्या व्याख्यानांत त्यांनी पुढे हेंच स्पष्ट केलें आहे. "आर्यभूमीला माता म्हणून ओळखणे हीच स्वदेशी चळवळ होय."
प्रभावी शस्त्र
यानंतर याच व्याख्यानांत त्यांनी 'बहिष्कार' याचा अर्थ स्पष्ट केला आहे. "बहिष्कार हें सामान्य शस्त्र नाही. त्याचा उपयोग कसा करावयाचा हे आपणांस शिकावयाचें आहे. स्वदेशींतच त्याचा उगम होऊन त्यामुळे जे परकीय तें आपोआप बाहेर पडते. राष्ट्रीय शिक्षणांतच स्वदेशी बहिष्काराचा अंतर्भाव होतो. तिन्हीहि आचरणीय असून स्वातंत्र्यपोषक आहेत. हे उपाय सर्वांस कळावे हा या नवीन चळवळीचा हेतु आहे."
'जें जें परकीय तें बाहेर टाकणें' असा बहिष्काराचा व्यापक अर्थ आहे. हिंदुस्थानांत सर्व परकीयच आहे. न्यायखातें, महसूलखातें, पोलिसखातें... सर्व खातीं परकीयांच्या सत्तेखाली आहेत. या सर्वांवर बहिष्कार, असा बहिष्काराचा व्यापक अर्थ घेतला तर मग तें केवढें राजकीय शस्त्र आहे हें उमगेल. जानेवारी १९०७ मध्ये 'टेनेट्स ऑफ दि न्यू पार्टी' या विषयावर टिळकांचें कलकत्त्याला व्याख्यान झालें. त्यांत त्यांनी हा व्यापक अर्थ स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, "आपल्याजवळ शस्त्रे नाहीत, पण त्यांची कांहीच जरूर नाही. त्यापेक्षा फार प्रभावी शस्त्र आपल्याजवळ आहे, आणि तें म्हणजे बहिष्कार हे होय. हें राजकीय शस्त्र आहे. आपण सरकारला महसूल वसूल करण्यांत साह्य करावयाचें नाही. आपल्या सरहद्दीबाहेर लढण्याचें आपण नाकारूं. न्यायखातें चालविण्यास आम्ही साह्य करणार नाही. आम्ही आमचीं न्यायालयें स्थापूं. आणि पुढे वेळ आली की, आम्ही कर देण्याचें बंद करूं. आपल्या संघटित प्रयत्नांनी हे आपल्याला करतां येणार नाही काय? हें शक्य झालें तर उद्याच्या उद्याच आपण स्वतंत्र होऊं." (रायटिंग्ज अँड स्पीचेस, गणेश अँड कं., मद्रास).
तुमचेच राज्य
धुळे, सोलापूर, पंढरपूर, पुणे येथील, 'आमची दुःस्थिति व त्यावर उपाय', 'आपले शत्रु आपणच', 'स्वदेशहित कसें साधावें?', 'श्रीशिवाजी-उत्सव' या विषयांवरील व्याख्यानांतून टिळकांनी हाच बहिष्कारयोग समजावून सांगितला आहे.