Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वराज्याचें राजनीतिशास्त्र । २६९

जुलमी राजसत्तेचा प्रतिकार हे नव्या राजनीतीचें दुसरें तत्त्व होय. इंग्रज सरकारने सभाबंदीचा कायदा केला तेव्हा टिळक म्हणाले, "हा कायदा जुलमी आहे. असा कायदा करण्याचा सरकारला हक्क नाही. मनगटाच्या जोरावर असेल, पण नीतीने नाही. ईश्वरदत्त वाणीचा हक्क काढून घेण्यास सरकारास हक्क नाही. मी तुम्हांला स्पष्ट सांगतो की, आज वाणीने तर उद्या कृतीने याचा तुम्हांला निषेध करावा लागेल. जो कायदा आपल्याला जुलमी वाटतो तो न मानणें हें प्रजेचें काम आहे." (व्याख्यानें, पृ. ५९), प्रतिकाराची ही राजनीति टिळकांनी जवळ जवळ प्रत्येक व्याख्यानांत सांगितली आहे. सुरतेची राष्ट्रीय सभा मोडल्यावर तेथेच त्यांचे नंतर व्याख्यान झालें. त्यांत ते म्हणाले, "कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेत झालेल्या ठरावाअन्वये आता पुढे काय केले पाहिजे याचा विचार करण्याकरिता आपण जमलों आहों. सरकार रागावलें तरी आम्ही मागे जाणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांना खूष करण्याच्या बुद्धीपेक्षा प्रतिकाराची बुद्धि दाखविण्याची, माझ्या मतें, ही वेळ आहे. आपल्याला जो थोडा अग्नि रक्षण करतां येण्यासारखा आहे त्या अग्नीची ज्वाला भडकेपर्यंत तो जळता ठेवण्यासाठी, जिवंत राखण्यासाठी, आपण कांही करूं शकणार नाही काय?"
ज्वाला
 ठिणगी, अग्नि, ज्वाला! टिळकांच्या मनांत अखंड एक राजनीतितत्त्व होतें. शेतकरी, कारागीर दरिद्री आहेत, अज्ञ आहेत. त्यांच्या दारिद्र्यांत ठिणगी टाकावयाची, आणि मग ज्या ज्वाला भडकतील त्यांत आमचा रक्तशोष करून दिवाळी साजरी करणाऱ्या इंग्रजी राज्याची होळी करावयाची!
 वर निर्देशिलेली अग्नीची ज्वाला सतत जिवंत ठेवण्याचें साधन कोणतें? 'स्वदेशी आणि बहिष्कार'
स्वदेशीचा अर्थ
 स्वदेशी म्हणजे स्वदेशांत, हिंदुस्थानांत होणारा कापड, साखर, कागद इत्यादि माल वापरावयाचा आणि बहिष्कार म्हणजे सर्व प्रकारच्या ब्रिटिश मालावर बहिष्कार घालावयाचा; पण हे शब्दांचे मूळ अर्थ झाले. टिळकांच्या चळवळींत त्या दोन्ही शब्दांना फार व्यापक अर्थ आले होते. टिळकांच्या मतें हीं दोन्ही राजकीय शस्त्रे होती; आणि त्यांचा स्वराज्याशीं अविभाज्य संबंध होता. हिंदी जनतेंत ब्रिटिश राज्याविषयी तीव्र असंतोष चेतवून तिला त्या साम्राज्यसत्तेशी झुंज घेण्यासाठी सिद्ध करणें हा त्या चळवळीचा हेतु होता. तेव्हा तें एक राजकीय शस्त्र होतें हे उघडच आहे.
 अकोला येथील व्याख्यानांत टिळकांनी हा विचार विशद केला आहे. ते म्हणतात, "स्वराज्याच्या साधनत्रयीपैकीच स्वदेशी व बहिष्कार हीं दोन साधनें आहेत. (तिसरें साधन म्हणजे राष्ट्रीय शिक्षण), स्वदेशी उद्योगधंद्यांना सरकार उत्तेजन