Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वराज्याचें राजनीतिशास्त्र । २६७

शेतकऱ्यांचा जमिनीवरचा हक्क नष्ट करण्याचा प्रस्ताव सरकारने संमत करून घेतला. त्या वेळी ना. मेथा, सर भालचंद्र गोखले, खरे इत्यादि कौन्सिलच्या सभासदांनी त्याला कसून विरोध केला होता, व सभात्यागहि केला होता; पण सरकारते त्याची पर्वा केली नाही. त्या वेळी 'दुराग्रही सरकार व निर्बल लोकमत', 'आमची कायदेकौन्सिलें थट्टा आहे काय?' असे लेख लिहून, आमचें लोकमत निर्बल असल्यामुळेच हें घडू शकतें, तेव्हा लोकमत प्रभावी केलें पाहिजे, असाच उपदेश टिळकांनी केला. त्या वेळी त्यांनी सैन्याला, सरदारवर्गाला किंवा दहशतवादी क्रांतिकारकांना चिथावणी दिली नाही. त्या शक्तींना आवाहन केलें नाही. जनशक्ति जागृत नसतांना सैन्य हें सामर्थ्य आहे, असें टिळकांच्या स्वप्नांत सुद्धा आलें नाही. आमचें लोकमत दुर्बल आहे, सरकारवर पगडा बसविण्याचें सामर्थ्य त्याच्यांत नाही, तेव्हा तें लोकमत जागृत केलें पाहिजे हा टिळकांचा महामंत्र होता. त्यानंतरच्या काळांतहि सरकार ज्या ज्या वेळी अत्यंत जुलमाचें व दडपशाहीचें कृत्य करी त्या त्या वेळी टिळकांनी याच शक्तीला आवाहन केलेले आहे. बंगालच्या फाळणीच्या वेळी त्यांनी याच शक्तीला उधाण आणून तिला संघटित करण्याचा प्रयत्न केला. "सरकार लाखो लोकांच्या मताला काडीइतकीहि किंमत देत नाही. या गोष्टीचा प्रतिकार करण्याचा कांही मार्ग आम्हीं काढला नाही, तर लोकांचा चळवळीवरचा विश्वास उडून जाईल: तेव्हा हें लोकमत जागृत करणें हें पुढाऱ्यांचे काम आहे. हल्लीचें लोकमत अळणी आहे. त्याचा अळणीपणा कसा घालवावयाचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे."
नवें राजनीतिशास्त्र
 त्या वेळी राष्ट्रीय सभेत दोन पक्ष होते. जहाल आणि मवाळ. यांपैकी टिळक हे जहाल पक्षाचे होते. त्या पक्षाचें तत्त्वज्ञान, धोरण व कार्यपद्धति हेंच वरील प्रश्नाला उत्तर होतें. लोकमताचा अळणीपणा कसा घालवावयाचा, या प्रश्नाला लोकमत जहाल करून अळणीपणा घालवावयाचा, हें उत्तर लो. टिळकांनी दिलें. आता लोकमत जहाल करावयाचें म्हणजे काय?
 नवें राजनीतिशास्त्र लोकांना शिकवावयाचें. हिंदुस्थानांत हजारो वर्षे अनियंत्रित अशी राजसत्ता होती. राजा हा परमेश्वर आहे, विष्णूचा अवतार आहे, अशी लोकांची श्रद्धा होती. लोक व त्यांचे शास्त्री- पंडितांसारखे नेते इतके नादान झाले होते की, औरंगजेबासारखा जुलमी, अत्याचारी मोगल बादशहाला सुद्धा ते विष्णूचा अवतार मानीत असत. प्राचीन काळीं राजा जुलमी निघाला, तर प्रजेने त्याला पदच्युत करावें, इतकेंच नव्हे तर ठारहि मारावें, असें धर्मशास्त्र सांगे; पण तें शास्त्र पुढे लोपलें. आणि 'पावसाने झोडलें व राजाने मारलें तर कोठे जायचें?' असा प्रश्न विचारण्याइतकी ती हीन-दीन व निर्जीव झाली. प्रजेने संघटित होऊन राजसत्तेला नियंत्रण घालावयाचें असतें ही कल्पनाच या देशांतून नाहीशी झाली, आणि लोक 'मुकी बिचारी कुणी हाका,' असे होऊन गेले.