Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६६ । केसरीची त्रिमूर्ति

जून द्यावयाचें, त्यांचें शौर्य-धैर्यादि सुप्त गुण जागे करावयाचे आणि मग ठिणगी पाडावयाची. वन्हि तो चेतवावा रे!
दिव्य दृष्टि
 हा मार्ग टिळकांनी आखला यांतच त्यांचें अलौकिकत्व आहे. गेल्या शतकाच्या उत्तरार्धांत जर्मनी, इटली, जपान, चीन या देशांत तेथील नेत्यांनी राष्ट्रसंघटना केली, स्वातंत्र्याचे लढे केले; पण ते सर्व जमीनदार, सरंजामदार, लष्करी सरदार यांच्या बळावर. लोकशक्तीला आवाहन त्यांनी केलेच नाही. ती एक महाशक्ति आहे. हें त्यांना आकळलेच नाही. भारतासारख्या मागासलेल्या देशांत, लोकशाहीची पूर्व-परंपरा मुळीच नसलेल्या देशांत, टिळकांनी ही शक्ति जाणली व तिला जागृत करून स्वातंत्र्याचा पाया घातला हेंच त्यांचें असामान्यत्व होय. ते क्रांतदर्शी होते, द्रष्टे होते असा त्यांचा गौरव आज सर्व जगभर होत आहे. त्याची यथार्थता यावरून कळून येईल.
जगाचे भाग्य
 भारत आज लोकायत्त देश झाला आहे; त्याने येथे प्रजासत्ताक शासन स्थापिलें आहे, हें खरोखर जगाचें मोठें भाग्य आहे. सोव्हिएट रशिया व चीन या देशांत गेल्या पन्नास वर्षांत दंडसत्ता स्थापन झाल्या. हिंदुस्थान हा त्यांच्यासारखाच जगांतला तिसरा मोठा देश. तोहि कम्युनिस्ट होऊन दंडायत्त झाला असता, तर जगांतील लोकशाहीचें भवितव्य निश्चित धोक्यांत आलें असतें. तें तसें आलें नाही, लोकशाहीला अजूनहि जगांत प्रतिष्ठा राहिली आहे, याचे श्रेय लो. बाळ गंगाधर टिळक यांना आहे. हिंदुस्थानांत लोकशक्ति जागृत करावयाची आणि येथे लोकसत्ताक शासन स्थापन करावयाचें हा निर्धार या महापुरुषाने प्रारंभापासून केला होता आणि सतत चाळीस वर्षे तन-मन झिजवून भारतीयांच्या मनांत लोकशासनाच्या आकांक्षा दृढमूल केल्या. आज जगांत नव्याने प्रस्थापित झालेल्या लोकसत्ता सर्वत धडाधड कोसळत असतांना भारतीय लोकसत्ता पंचवीस वर्षे अबाधित टिकून आहे याचें हेंच कारण आहे. हिंदी जनता लोकवादी झाली आहे.
सार्वलौकिक मत
 केसरीच्या दुसऱ्या वर्षाच्या मे महिन्याच्या अंकांतच 'मुत्सद्दी व योद्धा' या लेखांत लोकमान्यांनी भारतांतल्या खऱ्या शक्तीचा निर्देश केला आहे. ते म्हणतात, "इतक्या दिवसांच्या गाढ निद्रेतून अंमळ डोळे उघडून पाहण्याची मनीषा आम्हांला होऊं लागली आहे; परंतु सार्वलौकिक मत म्हणून जो एक नियामक अद्भुत उपाय आहे- ज्याला जुलमी राजे व अहंपणाचा तोरा बाळगणारे मंत्रीहि भितात- तशा प्रकारचें मत आपल्यामध्ये अजून उत्पन्न होऊं लागलें नाही. या गोष्टीला चांगले मुत्सद्दीच देशांत असले पाहिजेत", आणि जुलमी राजांनी भ्यावें असें लोकमत सिद्ध करण्याच्या प्रयत्नास टिळकांनी तेव्हापासूनच प्रारंभ केला. १९०१ साली