Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वराज्याचें राजनीतिशास्त्र । २६५

सभेच्या दुष्काळ कमिटीचे सेक्रेटरी प्रो. साठे यांनी "तुमचीं पिके बुडालीं असली तर तुम्ही सरकारास सारा देऊं नये", असें त्रिवार समजावून सांगितलें, 'पोलिसांच्या पेटलेल्या बंदुकीच्या टप्प्यांत भरलेली रयतेची जंगी सभा' असा मथळा देऊन टिळकांनी या प्रतिकाराच्या चळवळीचें वर्णन केले आहे.
 कायदेभंग, करबंदी, बहिष्कार, निःशस्त्र प्रतिकार या पुढच्या सर्व चळचळींची ही खत्तलवाडची सभा म्हणजे नांदीच होती.
 हिंदुस्थानचा व्यापार व येथले उद्योगधंदे ठार करणें आणि शेतकऱ्याचा द्रव्यशोष करणे हे हिंदुस्थानचा रक्तशोष करण्याचे इंग्रज सरकारचे दोन मुख्य उपाय होत; पण याशिवाय अनेक मार्गांनी तें परकी सरकार जळवांप्रमाणे हिंदी जनतेचें शोषण करीत होतें. त्या अनेक मार्गांपैकी हुंडणावळीचा दर वाढविणें हा तर राजमार्गच होता. हिंदुस्थानांत नाणें रुप्याचें होतें; पण इंग्लंडला धाडावयाचा पैसा हा सोन्याच्या नाण्यांत धाडावा लागे. तेव्हा पौंडाचा भाव वाढवून इंग्रज सरकार कोट्यवधि रुपयांची लूट करीत असे. साम्राज्यविस्तार करण्यासाठी ब्रह्मदेश, अफगाणिस्तान अशा देशांवर इंग्रज सरकार नेहमी स्वाऱ्या करीत असे. त्या स्वाऱ्यांचा सर्व खर्च हिंदुस्थानवर लादणें हा लूटमारीचा आणखी एक मार्ग होय. साम्राज्य ब्रिटिशांचें, खर्च हिंदी जनतेचा! होमचार्जेस ही तर उघड उघड लूट आहे असें दादाभाई कंठरवाने अनेक वर्षे सांगत होते. दरसाल वीस-पंचवीस कोटि रुपयांची अशी लूट होत असे. मागे उल्लेखिलेले गुरु गोविंद यांनी अशीच टीका त्या वेळी केली होती. टिळकांनी त्यांचाच उतारा देऊन हा विषय विशद करून, केसरीच्या दुसऱ्या वर्षी पुन्हा मांडला आहे.
शहाणे करोनि...
 पारतंत्र्यामुळे अशा या ज्या भयानक आपत्ति येतात त्यांवर उपाय काय? 'शहाणे करोनि सोडावें सकळ जन!' 'हिंदुस्थानापासून इंग्लंडास फायदे' या लेखांत टिळक म्हणतात, "एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावरचा अंमल निघण्यास जिंकलेल्या राष्ट्राचे शहाणपण कारण होतें. शहाणपणाच्या मागे सर्व गोष्टी येतात. लोक शहाणे होऊं लागले व त्यांना आपलें हिताहित कळूं लागलें म्हणजे त्यांना धैर्य येतें, कल्पना येते, संपत्ति मिळू लागते व अखेरीस स्वातंत्र्यहि मिळते. सर्व मोठेपणाचा पाया शहाणपण होय. जोपर्यंत जिंकलेल्या लोकांस शहाणपण येऊ लागलें नाही तोपर्यंत त्यांच्या हातून कांही एक व्हावयाचें नाही."
 केसरीच्या पहिल्या वर्षी सांगितलेला हाच विचार 'शेतकरी लोकांस बंड करावें लागेल काय?' या लेखांत टिळकांनी बारा वर्षांनी पुन्हा सांगितला आहे. त्याचा निर्देश वर आलाच आहे. दारिद्र्य व ज्ञान एकत्र झालों की, ठिणगी पडते!
 यावरून, प्रारंभापासूनच लो. टिळकांचा स्वराज्यप्राप्तीचा मार्ग निश्चित झाला होता, हें दिसून येईल. लोकांना शहाणे करावयाचें, त्यांना आपले हिताहित सम