Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६४ । केसरीची त्रिमूर्ति

लागेल काय?' या नांवाचे दोन लेख केसरीत लिहिले. (केसरी, ६ व १३ डिसेंबर १८९२) आणि त्यांत "शेतकरी लोक जोंपर्यंत अज्ञान आहेत तोंपर्यंत भीति नाही; पण दारिद्र्य व ज्ञान ही एकत्र झाली की, ठिणगी पडल्यावांचून राहणार नाही." असें एका इंग्रज पंडिताचें मत उद्धृत करून, तें अगदी यथार्थं आहे, असे स्पष्टपणें लिहून टाकलें, आणि शेवटीं लेखांचा समारोप करतांना, प्रत्येक देशहितचिंतकाने सरकारी अधिकाऱ्यांची किंवा अन्य कोणाची भीडमुरवत न धरतां शेतकऱ्यांची स्थिति सुधारण्याचे उपाय वेळीच अवश्यमेव केले पाहिजेत, असें सुशिक्षित हिंदी जनांना बजावलें. ते म्हणतात, "इंग्रजी राज्यावर पुढे केव्हा संकट येणार असेल तर तें उत्तरेकडून किंवा वायव्येकडून येणार नाही; पण सर्व देशांतील प्रजाच अन्नास महाग होऊन दंगा करण्यास प्रवृत्त झाली म्हणजे मात्र वेळ कठीण येणार आहे."
 टिळक कोणत्या आगीत उडी घेत होते तें यावरून कळून येईल. जो इशारा दिल्याबद्दल ह्यूमसाहेबास गोळी घालावी, असे इंग्रज अधिकाऱ्यांना वाटलें तोच इशास टिळक देत होते; व हिंदुस्थानांतील शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे बंडास प्रवृत्त करीत होते; आणि सुशिक्षितांनी हेंच कार्य केलें पाहिजे असें त्यांना पढवीत होते.
साराबंदी
 सारावाढीच्या जुलमाविषयी टिळक लेख लिहून थांबले, पण दुष्काळांत होणाऱ्या जुलमाच्या प्रतिकारासाठी त्यांनी प्रत्यक्ष मोहीमच उघडली. दुष्काळ ही हिंदुस्थानांतील नित्याचीच गोष्ट आहे. तेव्हा अशा प्रसंगी त्याच्या निवारणार्थ कोणती उपाययोजना करावयाची त्यासंबंधी सरकारने कांही नियम घालून दिले, व 'फॅमिन कोड' म्हणून ते प्रसिद्धहि केले. या फॅमिन रिलीफ कोडांत साऱ्याची सूट केव्हा, किती द्यावयाची, तो केव्हा, किती तहकूब ठेवावयाचा, जंगलें केव्हा खुलीं करावयाची, दुष्काळी कामावर मजुरी किती द्यावयाची, इत्यादि सर्व गोष्टींविषयी नियम बांधून दिलेले होते; पण प्रत्यक्षांत सरकारी अधिकारी दर वेळीं ते नियम वाऱ्यावर उधळून मन मानेल तसा कारभार करीत होते. म्हणून लोकांना जागृत करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक सभेतर्फे चळवळ सुरू केली. प्रथम त्यांनी फॅमिन रिलीफ कोडाचें मराठीत भाषांतर करून त्याच्या हजारो प्रती खेड्यापाड्यांत वाटण्याची व्यवस्था केली; आणि मग अनेक सुशिक्षित तरुणांना दुष्काळी भागांत धाडून शेतकऱ्यांच्या सभा घेऊन सरकार त्यांच्यावर कसा जुलूम करीत आहे, तें समजावून देण्यास प्रारंभ केला. ते तरुण शेतकऱ्यांना जाहीर सभेत सांगत की, "तुमचीं पिके बुडालीं आहेत तर तुम्ही सारा देऊं नका. सरकारचा नियमच तसा आहे." अशा सभेला कडेकोट पोलिस बंदोबस्त असे; पण तरीहि निर्भयपणे टिळकांचे कार्यकर्ते मुकत्यार अशी भाषणे करीत. १३ डिसेंबर १८९६ रोजी उंबरगाव पेट्यांत खत्तलवाड येथे कोळी, वारली, पांढरपेशे अशा लोकांची मोठी जंगी सभा झाली; त्या सभेस महालकरी, पोलिस-फौजदार, असि. कलेक्टर श्री. दुबोले हे सर्व हजर होते. सभेभोवतीं पोलिसांनी बंदुका भरून गराडा दिला होता. तरीहि सार्वजनिक