Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वराज्याचें राजनीतिशास्त्र । २६३

कमिशन नेमलें. याच वेळीं कलकत्त्याच्या स्टेट्समन या पत्राने या विषयावर पांच-सहा लेख लिहून, शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणास सावकार लोक जबाबदार नसून, खरें कारण सरकारचा कडकपणा हेंच आहे, इतकेंच नव्हे तर सावकार लोकांपासून शेतकऱ्यांस पूर्वी जी पुष्कळ प्रकारची मदत मिळत नसे तीहि कायदा झाल्यापासूनं बंद झाल्यामुळे त्यांचे अतिशय हाल होऊं लागले आहेत, असा स्पष्ट अभिप्राय दिला. त्या लेखांचाच सारांश टिळकांनी देऊन आपल्या लोकजागृतीच्या कामास पुन्हा चालना दिली.
सारावाढ
 लो. टिळक कायमधारा पद्धतीचे पुरस्कर्ते होते. त्या पद्धतीने शेतकऱ्याला जमिनीची मशागत करून तिची सुधारणा करण्यास हुरूप येतो. आपण जमिनींत कष्ट केले, तर त्याचें फळ कांही वर्षांनी सारावाढ करून सरकार हिरावून घेईल, असा धसका शेतकऱ्याच्या मनांत राहील तर कष्ट करण्यास त्यास उत्साह वाटणार नाही, हे उघडच आहे; पण इंग्रज सरकारला त्याची पर्वा नव्हती. "हिंदुस्थानला पिळून काढलें पाहिजे", असे लॉर्ड सॅलिसबरी जाहीरपणेंच म्हणाले होते; आणि हिंदुस्थान सरकारने तेंच धोरण ठेविलें होतें. जमिनीचें उत्पन्न वाढलें तर सरकारने थोडा सारा वाढवावा हें ठीक आहे, पण त्याला कांही मर्यादा आहेत. १८७४ आणि १८८४ या दोन सालीं विलायत सरकारने ठराव करून या मर्यादा घालून दिल्या होत्या. कांही ठिकाणी शे. ३३, कांही ठिकाणीं शे. ६६ व जास्तीत जास्त म्हणजे शे. १०० अशी सारावाढ त्या ठरावांनी मंजूर केली होती. पण १८९९ साली हिंदुस्थान सरकारने सर्रास दुप्पट, तिप्पट व कोठे कोठे पांच सहापट सारावाढ केली. त्यांवरच 'फेरपाहणीचा जुलूम' (केसरी २४-१०-१८९९), या लेखांत टिळकांनी कडक टीका करून 'प्रजेचा संतोष' हेंच ज्या सरकारच्या राज्याच्या बळकटीचें लक्षण आहे, त्याने अन्यायाने, दांडगाईने आपल्या तिजोरीची भर करणें चांगलें नाही, असा इशारा दिला आहे.
ठिणगी
 पण असा इशारा देणारे लोक सरकारला अत्यंत अप्रिय होऊन जात. १८९२ साली राष्ट्रीय सभेचे सेक्रेटरी श्री. ह्यूम यांनी दोन सर्क्युलरें प्रसिद्ध केलीं आणि "हल्ली शेतकऱ्यांची जी स्थिति आहे ती तशीच कायम राहिल्यास लवकरच ते बंड करण्यास उद्युक्त होतील, व एकदा असे दंगेधोपे होऊं लागले म्हणजे त्यांत सरकार, जमीनदार, शिकलेले लोक वगैरे कांहीएक भेदाभेद न होता; सर्वजण सारखेच बळी पडतील" असा इशारा दिला; पण याचा इंग्रज अधिकाऱ्यांना इतका संताप आला की, ह्यूमसाहेब लोकांना बंड करण्यास प्रवृत्त करीत आहेत, असा त्यांच्यावर आरोप करून त्यांना गोळी घालून मारावें, असा ओरडा त्यांनी सुरू केला. आणि हाच विषय घेऊन टिळकांनी, 'हिंदुस्थानांतील शेतकरी लोकांस खरोखरच बंड करावें