स्वराज्याचें राजनीतिशास्त्र । २६१
कौशल्य' ह्या लेखांत पुनःपुन्हा हा विचार मांडण्यांत आलेला आहे. 'मराठा' पत्राच्या १८८१ सालच्या पहिल्या दोन महिन्यांतच याविषयी चार लेख आले आहेत. १८८२ च्या प्रारंभींहि असेच लेख आढळतात. त्यांचा मथितार्थ असा:
रानतोडू लोक
इंग्लिशांनी आमचा सर्व व्यापार बळकावला आणि येथल्या उद्योगधंद्यांचा नाश केला, हेंच आमच्या दारिद्र्याचें खरें कारण आहे. हिंदुस्थान सध्या केवळ कच्चा माल पुरविणारा देश होऊन बसला आहे. आम्हांला लागणारा सर्व पक्का माल परदेशांतून येतो, विलायतेंतून येतो, ही अत्यंत लज्जास्पद स्थिति आहे. ती नाहीशी करावयाची तर आम्ही देशी उद्योगधंदे काढले पाहिजेत. हा देशं सृष्टिजन्य पदार्थांच्या बाबतींत समृद्ध आहे. येथे मजुरीहि स्वस्त आहे. पण त्या मूळ द्रव्यावर, कच्च्या मालावर, संस्कार करून त्याचा पक्का माल करण्याचे कारखाने येथे नाहीत. आम्ही केवळ धान्यपिकवू व रानतोडू लोक झालों आहों. एवढ्यावर कोणतेंहि राष्ट्र संपत्तिमान् होत नाही! आम्हीं खंडीच्या खंडी मुलद्रव्यें उत्पन्न करावीं, दुसऱ्या राष्ट्रांनी तीं जहाजे भरभरून न्यावीं आणि त्यांवर कुशलतेची करामत करून ती पुनः आम्हांकडे विकण्यास आणावीं व हवे तसे पैसे मिळवावे ही केवढी दुःखाची गोष्ट! असा प्रकार आमच्या देशांत आणखी कांही वर्षे चालला तर येथील माणसें एकमेकांना खाऊं लागतील, यांत काडीचा संशय नाही.
औद्योगिक विकास
या भीषण भवितव्यांतून सुटावयाचें असेल, तर आपण कच्च्या मालाचा पक्का माल करण्याचे कारखाने येथे काढले पाहिजेत. त्यासाठी भांडवल लागेल तें समाइकीने उभारलें पाहिजे; आणि तज्ज्ञ कारागीर लागतील त्यासाठी आपले विद्यार्थी परदेशी पाठवून त्यांना तज्ज्ञ करून आणलें पाहिजे.
या वेळी असे विद्यार्थी परदेशी धाडण्याची एक योजना पुण्याच्या सार्वजनिक सभेने आखली होती. तिचा पाठपुरावा केसरी व मराठा या दोन्ही पत्रांत केलेला आढळतो. मराठा पत्रांत शास्त्रीय ज्ञानाचें महत्त्व विवरून सांगितले असून शास्त्रीय ज्ञानावांचून खरी संस्कृति निर्माण होऊ शकत नाही, असें म्हटलें आहे; आणि शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार व औद्योगिक विकास हा सध्याच्या दारिद्र्यांतून सुटण्याचा एकमेव उपाय होय, असें सांगितलें आहे.
स्वदेशी
'स्वदेशी व बहिष्कार' ही चळवळ १९०५ च्या सुमारास सुरू झाली; आणि अत्यंत वेगाने सर्व देशभर पसरली, पण तोहि विचार केसरीच्या पहिल्या वर्षापासूनच टिळकांच्या मनांत उदित झाला होता, असें दिसतें. मँचेस्टरच्या व्यापाऱ्यांनी नाना उपाय करून त्यांच्या हिंदुस्थानांत येणाऱ्या मालावरची जकात कमी करून घेतली. बाह्यतः त्यांनी असे दाखविलें की, हिंदु लोकांना कपडा स्वस्त पडावा हा