२६० । केसरीची त्रिमूर्ति
सिद्धान्त सविस्तर मांडला आहे. सर थॉमस मनरो यांनी 'हाऊस ऑफ कॉमन्स कमिटीपुढे काश्मिरी शालीची कीर्ति गायिली ती ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांस सहन झाली नाही. आणि १७६९ सालींच त्यांनी हुकूम काढला की, हिंदुस्थानांतील फक्त कच्च्या मालास उत्तेजन द्यावें व पक्का माल होता होईल तो तयारच होऊ देऊ नये. त्याअन्वये येथील कोष्ट्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कारखान्यांतच त्यांनी नोकरी केली पाहिजे, स्वतंत्रपणें माल तयार करता कामा नये, असें फर्माविलें; आणि ज्यांनी नकार दिला त्यांना कडक शिक्षा केल्या. यानंतर कंपनीने येथून देशाबाहेर जाणाऱ्या मालावर जबर जकात बसविली. अशा मालावर शेकडा ६२२ पावेतों जकात ठेवून हिंदी व्यापाऱ्यांच्या व कारागिरांच्या नरडीस नख लावण्यांत आलें. येथल्या उद्योगांची व व्यापारांची अशी व्यवस्था केल्यावर कंपनी विलायती माल हिंदुस्थानांत पाठविण्यास मोकळी झाली. कारण स्पर्धा नाहीशी झाली होती. याचा परिणाम काय झाला? १८३० सालीं विलायतेंतून फक्त साडेसात लाखांचा माल हिंदुस्थानांत येत असे. तोच १९०० सालीं जवळ जवळ ९२ कोटि रुपयांचा माल तिकडून आला. आमचा माल परदेशीं जाऊं नये व तेथला माल येथे यावा एवढीच व्यवस्था करून कंपनीचे अधिकारी थांबले नाहीत. देशांतल्या देशांत पाठविल्या जाणाऱ्या मालावर देखील त्यांनी जबर जकात बसविली. यामुळे येथला व्यापार व येथली कारागिरीहि सर्वस्वीं बुडाली.
कोष्ट्याच्या धंद्याप्रमाणेच इतर कलाकौशल्याच्या धंद्यांची अवस्था झाली. हा सर्व नाश जाणूनबुजून करण्यांत आला होता. इतर राहिलेल्या धंद्यांचा नाश इंग्रजी सुधारणांमुळे झाला. येथे आगगाडी आली. त्याच्या आधी १७८० मध्ये एकट्या गंगेच्या प्रवाहांतून मालाची ने-आण करणारे ३०,००० नावाडी होते. आगगाडीमुळे एवढ्या लोकांच्या तोंडचें अन्न गेलें. येथल्या प्रत्येक उद्योगाची इंग्रजी राज्यामुळे अशी वाताहत झाली; आणि आम्ही अन्नाला मोताद झालों.
असे सर्व विवेचन करून 'आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले?' या लेखाच्या शेवटी टिळक म्हणतात, "हिंदुस्थानचा व्यापार ठार झाला अथवा येथील लोकांचे उद्योगधंदे बुडाले यांत नवल नाही. जर अशा तऱ्हेचे कायदे इंग्लंडास लागू केले असते अथवा इतकी परतंत्र स्थिति दहा-वीस वर्षेच इंग्लंडांत राहिली असती तर तें राष्ट्र केंव्हांच रसातळाला गेलें असतें, असें मानणें तर्कशास्त्रास सोडून होणार नाही."
केसरी व मराठा या पत्रांच्या पहिल्या वर्षापासून लो. टिळक हा विचार सतत सांगत आले आहेत. केसरीच्या पहिल्या सात वर्षांतील अनेक लेख 'केसरींतील निवडक निबंध' या नांवाने दोन पुस्तकांत छापलेले आहेत. त्यांतील 'आम्ही या दारिद्र्यांतून कशाने सुटूं?', 'व्यापाराखेरीज तरणोपाय नाही', 'अप्रतिबंध व्यापार आणि उत्तेजन', 'समाइकीने उभारलेल्या भांडवलाचे कारखाने', 'उद्योगवृद्धि', 'भारतीय शास्त्रकलांचे पुनरुज्जीवन' आणि 'हिंदुस्थानचे कला