स्वराज्याचें राजनीतिशास्त्रं । २५९
त्या वेळेपासूनच लिहीत होते. या सर्वांच्या आधाराने टिळकांनी इंग्रज राज्यकर्त्यांची राजनीति कशी आहे, तें हिंदी लोकांना स्पष्ट करून सांगितलें.
पाऊण आणा रोज
'आम्ही आमच्या दारिद्र्यांतून कशाने सुटू' या लेखांत टिळकांनी डिग्बी यांच्या प्रतिपादनाचा मथितार्थ दिला आहे. लोकमान्य म्हणतात, "डिग्बी यांनी आपल्या 'हिंदुस्थानासंबंधी प्रश्न' या पुस्तकांत हिंदु लोकांच्या दारिद्र्याची अशी खाशी तसबीर काढली आहे की, ती पाहून पाषाणाला सुद्धा द्रव आल्यावांचून राहणार नाही. डिग्बी यांनी म्हटले आहे की, "नेटिव राजे प्रजेला चाबकाखाली झोडीत, पण आम्ही (इंग्रजबहाद्दरांनी) त्यांच्या अंगाला विंचवाच्या नांग्या लावल्या आहेत." (केसरी, वर्ष दुसरें, अंक १ ते ४). याच डिग्बीसाहेबांच्या दुसऱ्या 'प्रॉस्परस इंडिया' या उपरोधी नांवाने लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारें, टिळकांनी हिंदी जनतेच्या दारिद्रयाचा हिशेब दिला आहे. १८५० सालीं हिंदुस्थानचे दर माणशी रोजचें उत्पन्न दोन आणे होते. १८८० सालीं तें दीड आण्यावर आलें व १९०० सालीं तें फक्त पाऊण आणा होतें. डिग्बी यांनी सरकारी रिपोर्टाचेच आधार घेऊन ही माहिती दिली आहे. आणि आरंभीच हिंदुस्थानचे महानबाब लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांना उद्देशून म्हटले आहे की, "माझ्या पुस्तकांतील गोष्टी सर्व सरकारी रिपोर्टांतून घेतल्या आहेत. त्या खोट्या तरी ठरवा किंवा हिंदुस्थानास भिकेस लावणारी राज्यपद्धति तरी बदला." (केसरी, लेख, खंड २, रा पृ. २९५, ३००).
सुवर्णभूमीची अन्नान्नदशा
हिंदुस्थानला हें भीषण दारिद्र्य कशामुळे आलें? एके काळी ही भूमि म्हणजे सुवर्णभूमि होती. सतराव्या-अठराव्या शतकांत येथे डीलाव्हेल, रे, टार्मर, डॉ. फायर इत्यादि जे युरोपीय प्रवासी येऊन गेले त्यांनी येथल्या उद्योगधंद्यांच्या भरभराटी- संबंधाने मोठ्या गौरवाने लिहून ठेविलें आहे. प्राचीन काळीं तर इराण, चीन, रोम, तुर्कस्थान या देशांशी आमचा व्यापार चालू होता. येथले कारागीर अत्यंत कुशल असून, त्यांच्या कलाकौशल्याची ख्याति जगभर झाली होती. गेल्या शतकापर्यंत युरोपांतील राजस्त्रिया हिंदुस्थानांतील सुती व रेशमी तलम वस्त्रावांचून दुसरीं वस्त्रे वापरण्यास नाखूष असत. असे हें कुशल कारागीर व त्यांच्या मालाचा जगभर विक्रय करणारे व्यापारी यांच्यामुळे हिंदुस्थानांत बाहेरून सोन्याचे पाट वाहत येत असत. असा हा देश आता भिकेला कां लागला? त्याची अन्नान्नदशा कां झाली?
नरडीस नख
येथल्या कारागिरांचें कलाकौशल्य व येथला व्यापार इंग्रज सरकारने जाणून- बुजून नष्ट केला म्हणून हिंदुस्थानला दारिद्र्य आले आहे, असा सिद्धान्त टिळकांनी मांडला. 'आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले?' (केसरी, ११-११-१९०२); आणि 'कंपनी सरकार व इंग्रज सरकार' (२५-११-१९०२), या लेखांत त्यांनी हा