२५८ । केसरीची त्रिमूर्ति
तर त्यांचें परकीयत्व तत्काल लुप्त होईल. येथल्या अनेक जातिजमातींपैकी ती एक जमात होऊन तिची 'स्व'मध्येच गणना होईल; आणि तसें टिळकांनी स्वतःच म्हटलें आहे, हें वरील उताऱ्यावरून दिसून येईल. तेव्हा हें सरकार अन्यायी आहे, जुलमी आहे, स्वार्थप्रेरित आहे, लुटारू आहे, रक्तशोषक आहे, हा विचार सतत मांडून, त्याचें काळें अंतरंग लोकांना दाखवून त्यांना स्वराज्याच्या चळवळीसाठी, इंग्रज सरकारशी लढा करण्यासाठी सिद्ध करणें हेंच टिळकांचें राजकारण होय. त्यांनी पुनः पुन्हा तुरुंगवासाच्या दारुण यातना सोसल्या आणि आत्म-बलिदानाची सतत सिद्धता ठेवली ती यासाठीच.
नवी राजनीति
हें राजकारण, स्वराज्याची ही राजनीति, हिंदुस्थानाला सर्वस्वी नवी होती. एका व्यक्तीने शासनावर सत्ताधाऱ्यावर टीका करावयाची, विचाराने, तत्त्वज्ञानाने तिचा नैतिक पायाच हादरून टाकावयाचा आणि त्यासाठी हालअपेष्टा, तुरुंगवास सोसावयाचा ही कल्पनाच या देशाला पूर्वीच्या काळी कधी स्फुरलेली नव्हती; कारण राज्यक्रांति लोकांकडून करवावयाची असते हा विचारच येथे कधी उद्भवला नव्हता. भारतांत लो. टिळकांनी तो प्रथम मांडला; आणि त्या पद्धतीने येथे जागृति घडवून आणली. त्यांच्या या कार्याचें या प्रकरणांत विवेचन करावयाचें आहे.
दारिद्र्य
इंग्रजी राज्यांत हिंदुस्थान दरिद्री होत आहे, हें दारिद्र्य दिवसेदिवस भीषण स्वरूप धारण करीत आहे, आणि हें असेंच चालू राहिलें तर एक दिवस या देशांत भडका उडाल्यावांचून राहणार नाही, हा विचार लो. टिळक केसरीच्या पहिल्या वर्षापासून सतत सांगतांना दिसतात. राष्ट्रपितामह दादाभाई नौरोजी यांनी दीर्घकाल अभ्यास करून प्रथम हा विचार १८७१ साली विलायतेत 'ईस्ट इंडिया फायनॅन्स कमिटी' पुढे साक्ष देतांना मांडला; आणि तोच पुढे त्यांनी 'पॉवर्टी अँड अब्रिटिश रूल इन इंडिया' या ग्रंथांत विस्ताराने प्रतिपादिला. हाच विचार पायाभूत म्हणून स्वीकारून विष्णुशास्त्री, आगरकर व टिळक ह्यांनी आपलें राजकारण उभारलें, असें आचार्य जावडेकर ह्यांनी म्हटले आहे ते यथार्थ आहे. दादाभाईंच्याबरोबरच श्री. डिग्बी या इंग्रज गृहस्थाच्या 'प्रॉस्परस इंडिया' या ग्रंथाचा उल्लेख टिळकांनी केला आहे. त्यानेहि दादाभाईंच्यासारखाच सिद्धान्त मांडला आहे. काँग्रेसचे आद्य प्रवर्तक श्री. हयूम यांचाहि टिळकांनी याच दृष्टीने मोठा गौरव केला आहे. पंडित गुरु गोविंद हे इंग्लंडमध्ये राहणारे एक हिंदी गृहस्थ. त्यांनी तेथील 'स्टेट्समन' या मासिकांत चार-पांच लेख लिहून हिंदुस्थानांत इंग्रजी राज्यामुळे सर्वत्र आबादीआबाद आहे, असें गुणगान करणाऱ्या डॉक्टर हंटर या गृहस्थाला खरमरीत उत्तर दिलें होतें. हे त्यांचे लेख १८८० सालांतले आहेत. डिग्बीसाहेबहि