स्वराज्याचें राजनीतिशास्त्र । २५७
केवळ स्वार्थाने प्रेरित झाला आहे, हें पुनः पुन्हा सांगितलें आहे. 'फार दिवस घडत असलेला वचनभंग' या लेखांत १८९३ साली एका इंग्रज अधिकाऱ्यांचे उद्गारच त्यांनी दिले आहेत. "हिंदुस्थान देश जो जिंकला आहे तो, हिंदुस्थानच्या फायद्यासाठी नाही. तर राज्यकर्त्यांचा व्यापार वाढावा व त्यांच्या पोराबाळांची तरतूद व्हावी एवढ्याकरिताच होय", असें एका मोठ्या इंग्रज अंमलदाराने बोलून दाखविलें होतें. (केसरी, खंड १ ला, पृ. १७६).
परकी सरकार
हाच भाव लोकांच्या मनांत दृढमूल करण्यासाठी इंग्रज सरकार हें परकी सरकार आहे, असें वारंवार अट्टाहासाने ते सांगत असत. के. सी. एस्. आय्. ही बडी पदवी धारण करणाऱ्या एका इंग्रजाने, हिंदुस्थानांत इंग्रजांनी सर्व जुन्या संस्था, परंपरा चालू ठेवल्या आहेत, लोकांना स्वातंत्र्य दिले आहे व लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच कारभार चालविला आहे, तेव्हा अशा सरकारला परकी सरकार म्हणणें योग्य नाही, असा मुद्दा मांडला होता. त्याला टिळकांनी जें उत्तर दिलें आहे त्याचा आशय असा : आमच्या देशाची सांपत्तिक स्थिति सारखी खालावत चालली आहे. या देशाचा पैसा पांच हजार कोसांपलीकडे जाऊन पडतो. हत्यारांचा कायदा, ज्यूरीचा कायदा यांत पाश्चिमात्य व पौर्वात्य असा भेद केला जातो; असें असतांना इंग्रज सरकार परकी नव्हे, असें म्हणणें लपंडावाचें आहे. ज्या दिवशी इंग्रज लोकांपुरते निराळे कायदे होण्याचें बंद होईल, अठरापगड जातींसारखीच टोपीवाले ही एकुणिसावी जात होईल, ज्या वेळीं हिंदुस्थानच्या तिजोरीतील सर्व पैसे हिंदुस्थानांतच खर्च होतील, व इंग्लंड आणि हिंदुस्थान हे मित्रत्वाच्या नात्याने राहू लागतील तेव्हाच इंग्रज सरकारचा परकेपणा लुप्त होईल. (केसरी, लेख खंड १ ला, पृ. ३६९).
राजकारणाचा पाया
इंग्रज सरकार परकी आहे, तें हिंदुस्थानच्या प्रजेचा रक्तशोष करीत आहे, त्यांच्या राज्यांत हिंदुस्थानचा सारखा अधःपात होत आहे, हें राज्य अन्यायाचें आहे, जुलमाचें आहे, या राज्यांत लोकांची अन्नान्नदशा होऊन दरसाल लक्षावधि लोक मृत्युमुखी पडत आहेत, आणि तरीहि दिवसेदिवस जास्त जास्त कर लादून, सारा वाढवून इंग्रज येथल्या प्रजेला पिळून काढीत आहेत, हा जो विचार, आणि यांतून सिद्ध होणारें जें तत्त्वज्ञान तें म्हणजे टिळकांच्या राजकारणाचा पायाच होय. त्यांनी हिंदी जनतेंत जो असंतोष निर्माण केला तो इंग्रजांची ही रक्तपिपासु राजनीति लोकांच्या निदर्शनास आणूनच केला. स्वराज्य कशासाठी पाहिजे या प्रश्नाला त्यांचें हेंच उत्तर होतें. तात्त्विकदृष्ट्या पाहिलें तर परकी सुराज्यापेक्षां स्वकीय वाईट राज्यहि चांगलें हें खरें; तसें एक-दोन ठिकाणी टिळकांनी म्हटलेंहि आहे; पण अंती हा विचार तात्त्विकच राहतो. कारण परकी सत्ताधारी प्रजेच्या कल्याणाची चिंता वाहून, खरोखरच केवळ प्रजेच्या हिताच्याच दृष्टीने कारभार करूं लागले,
के. त्रि. १७