Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-५-

स्वराज्याचें राजनीतिशास्त्र


 भिन्न धर्म, वंश, पंथ, भाषा, प्रांत, परंपरा इत्यादि कारणांनी भेद-जर्जर झालेल्या हिंदी समाजांतून एक संघटित हिंदी राष्ट्र निर्माण करणें हें लो. टिळकांचें अंतिम ध्येय होतें, हें वर अनेकवार सांगितलेंच आहे. या राष्ट्रनिर्मितीसाठी धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था, राजकारण ह्या सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत फार मोठें परिवर्तन घडविणें अवश्य आहे, हें प्रारंभापासूनच त्यांच्या मनाशीं निश्चित झालेलें होतें; आणि म्हणूनच त्या सर्व दिशांनी त्यांनी प्रयत्न आरंभिले होते. त्या प्रयत्नांचाच मागोवा येथवर आपण घेतला. गेल्या प्रकरणांत, त्यांच्या मतें धर्मक्षेत्रांत कोणतें परिवर्तन व्हावयास हवें होतें त्याचें विवरण केलें. आता राष्ट्रनिर्मितीसाठी व स्वराज्यप्राप्तीसाठी कोणतें राजनीतिशास्त्र हिंदी समाजाला त्यांनी सांगितलें त्याचा विचार करावयाचा आहे.
केवळ स्वार्थासाठी
 स्वराज्याच्या राजनीतिशास्त्रांतला त्यांचा पहिला सिद्धान्त हा की, कोणताहि देश दुसऱ्या देशावर सत्ता गाजवितो, तो केवळ स्वार्थासाठी होय. जित देशाच्या कल्याणासाठी कोणी कधीहि असला उद्योग करीत नाही. 'अनावर राज्य-विस्तार' या लेखांत ते म्हणतात की, "इंग्रज लोक हिंदुस्थानाचें राज्य करीत आहेत तें दरबारी भाषेंत जरी हिंदुस्थानच्या हिताचे असले तरी, वास्तविकरीत्या पाहिलें तर इतर युरोपियन राष्ट्रांची एशिया किंवा आफ्रिका खंडांत जी राज्यतृष्णा व चळवळ दिसून येते तीहून इंग्लिश लोकांची चळवळ फारशी भिन्न नाही असें आढळून येतें." (केसरी, खंड २ रा २५ फेब्रुवारी १९०२) याच लेखांत इंग्रजांच्या जगांतल्या अवाढव्य उद्योगाचें वर्णन करून हिंदुस्थानांतील त्यांचा कारभार