Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५४ । केसरीची त्रिमूर्ति

अभिमान बाळगून त्याचें राष्ट्रीय दृष्टीने पुनरुज्जीवन करावें असें ते सतत सांगत असल्यामुळे त्यांचे हिंदु धर्मजागृतीचे प्रयत्न राष्ट्रैक्यास मुळीच बाधक नव्हते, हे स्पष्ट आहे.
 लो. टिळकांना हिंदु धर्माचें जें पुनरुज्जीवन करावयाचें होतें त्याचें स्वरूप काय होतें तें येथवर केलेल्या विवेचनावरून स्पष्ट होईल. बनारसला ३ जानेवारी १९०६ या दिवशीं भारत-धर्म- महामंडळापुढे त्यांचें जें व्याख्यान झालें त्यांत यासंबंधीचे त्यांचे सर्व विचार एकत्र आलेले आहेत. तेव्हा स्वतंत्रपणें निराळा समारोप करण्याऐवजी त्या व्याख्यानाचा सारार्थ येथे देऊनच या विवेचनाचा समारोप करतों.
 लोकमान्य म्हणतात, "भारत-धर्म- महामंडळ हें नांव सार्थ केव्हा होईल?. हिंदु धर्मात सध्या अनेक पंथ, उपपंथ, शाखा, उपशाखा यांचे तण फार झाले आहे. त्या सर्वांना एकत्र संघटित करून त्यांचें दृढ ऐक्य मंडळ करील तेव्हा त्याचें 'धर्म महामंडळ' हें नांव सार्थ होईल. आपणांत अनेक भेद व फळ्या असतांना, एक पंथ दुसऱ्याचा तिरस्कार करीत असतांना, म्हणजेच आपण असे शतधा विभक्त असतांना हिंदु म्हणून वैभवास चढणें आपल्याला शक्य होणार नाही.
 "धर्माची व्याख्याच मुळी 'धारण करणारा तो धर्म' अशी आहे. धारण करणें म्हणजे एकत्र आणणें, बांधणे. माणूस व परमेश्वर ह्यांना व सर्व मानवांना एकत्र संघटित करणें म्हणजे धारणा करणें होय. यासाठी प्राचीन काळाकडे दृष्टि टाकून वेद, गीता आणि रामायण हें जें आपल्या परंपरेचें वैभव आहे तें शिरसावंद्य मानून आपण आपसांतले इतर भेद दृष्टीआड केले पाहिजेत आणि एक बलाढ्य हिंदु राष्ट्र निर्माण केलें पाहिजे.
 "सध्या आपल्या धर्माला वाईट कळा आली आहे. फूट, दुही, भेद, विभक्तता ह्यांनी आपल्याला ग्रासले आहे. आपण अत्यंत आळशी व मूर्ख झालों आहों. आपल्या प्राचीन ग्रंथांचा आपण अभ्यास करीत नाही. त्या ग्रंथांचें सुवर्ण वैभव आपल्या ध्यानांत आणून देण्यास आपल्याला पाश्चात्य पंडितांची गरज भासते. हे सर्व दोष महामंडळाने नष्ट करून आपल्या प्राचीन धर्माचें पुनरुज्जीवन केलें पाहिजे.
 "आपल्या प्राचीन धर्माचीं तत्त्वें किती उज्ज्वल आहेत तें आज विज्ञानाने सिद्ध होत आहे. सर्व चराचरांत चैतन्य भरलें आहे हा वेदान्ताचा सिद्धान्त आज जगदीशचंद्र बोस यांनी शास्त्राच्या आधारें सिद्ध केला आहे. आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धान्त इतके दिवस स्पेन्सरसारखे पंडित मान्य करीत नव्हते; पण सर ऑलिव्हर लॉज, मेयर यांसारखे शास्त्रज्ञ आता शरीराबरोबर आत्मा विनाश पावत नाही, असें सांगत आहेत. अमेरिकन पंडित आज वेदान्त, योग यांचा अभ्यास करीत आहेत; आणि तेच असे दाखवीत आहेत की, या शास्त्रांतलीं तत्त्वें विज्ञानपूत आहेत.
 "हें ध्यानीं घेऊन आपण आपल्या प्राचीन धर्म-ग्रंथांचे पुन्हा नव्या दृष्टीने संपादन केलें पाहिजे; आणि विज्ञानाच्या नव्या प्रकाशांत ते जगापुढे मांडले