Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्माचें पुनरुज्जीवन । २५३

अशा शंकांचे वेळोवेळीं निरसन करून, त्यांनी आपली विशुद्ध राष्ट्रीय भूमिका स्पष्ट केली आहे. तिचा परामर्श घेऊन हें विवेचन संपवू.
 १९०४ च्या गणेशोत्सवांत ते म्हणतात, "नुसती हिंदु धर्माची जागृति केली तर इतर धर्मांचा तिरस्कार वाढेल व त्यामुळे राष्ट्रैक्याचा घात होईल... असें म्हणणारी अजूनहि कांही मंडळी आहे; पण धर्माचा नायनाट करून सर्व समाज धर्मशून्य बनल्यामुळे राष्ट्रैक्य किंवा राष्ट्रोन्नति झाल्याचें जगांत एकहि उदाहरण नाही... इतर धर्मांबद्दल द्वेष व विरोध वाढू न देतां हिंदु धर्माची जागृति व उन्नति करून हिंदुधर्मीयांचा मिलाफ करणें शक्य आहे."
समानहितत्व
 "या देशांतील सर्वधर्मीयांनी आपापल्या धर्माचा अभिमान अवश्य बाळगला पाहिजे, पण तो राष्ट्रीयत्वाच्या आड येऊं देतां कामा नये." असें हिंदु-मुसलमानांचे तंटे सुरू झाले तेव्हापासून टिळक सांगत आले आहेत. 'हिंदु-मुसलमानांचा समेट' या लेखांत ते म्हणतात, "हिंदु-मुसलमान लोकांनी ज्या नात्याने एकत्र राहावयाचे तें कांही अंशी अमेरिकेत निरनिराळ्या जातींचे, निरनिराळ्या धर्माचे लोक जसे एकत्र राहतात तशा प्रकारचें असलें पाहिजे... हिंदु-मुसलमान लोकांचे रीतिरिवाज, संस्कार, उत्सव- सोहळे हे बऱ्याच गोष्टींत भिन्न आहेत, परंतु एकदा सलोख्याने व मित्रत्वाने वागावयाचें, असा निश्चय झाल्यावर एकमेकांनी एकमेकांच्या सोयीसाठी व समजुतीसाठी कांही गोष्टी करण्यास व कांही गोष्टी सोडण्यास कबूल झालें पाहिजे." (केसरींतील लेख, खंड १, पृ. २३५). 'ख्रिस्ती धर्म व हिंदुस्थानांतील लोकांचें राष्ट्रीयत्व' या लेखांत या विषयाचें टिळकांनी आणखी स्पष्टीकरण केलें आहे. ते म्हणतात, "राष्ट्रीयत्वाची सिद्धि होण्यास स्वधर्म, स्वभाषा, स्वदेशाभिमान व पूर्वेतिहासस्मरण ह्या गोष्टी कारणीभूत होतात, हें 'राष्ट्रीयत्वाची कल्पना' या लेखांत, सुमारें एक महिन्यापूर्वी आम्हीं सांगितलेच आहे. तथापि समानहितत्व हे राष्ट्रीयत्वाची कल्पना सिद्ध होण्याचें प्रत्यक्ष कारण होय व स्वधर्मप्रीति वगैरे दुय्यम प्रकारची कारणें होत, असेंहि आम्हीं सांगितलें होतें. म्हणजे हिंदुस्थानांतील निरनिराळ्या जातींतील लोकांमध्ये जर यापुढे केव्हा राष्ट्रीयत्वाची कल्पना उत्पन्न होऊन ती प्रबल होण्याचा संभव असेल, तर सर्व लोकांनी स्वधर्म, स्वभाषा व आपला पूर्वेतिहास यांविषयी प्रीति बाळगून सर्वांस समान असें जे राजकीय हक्क ते मिळविण्यास उद्युक्त झाले पाहिजे." (केसरीतील लेख, खंड ३ रा, पृ. २३८).
 लोकमान्यांचें 'हिंदी राष्ट्र' हें निश्चित उद्दिष्ट असल्यामुळेच त्यांनी पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम ह्या सर्वांना एकराष्ट्रीयत्वाच्या मुशींत ओतण्याचा अखंड प्रयत्न चालविला होता. आज ज्याच्यावर कांही अर्धवट लोक गहजब करीत आहेत तो 'लखनौचा करार' यासाठीच होता. आणि सर्वधर्मीयांनी आपापल्या धर्मांचा