२५२ । केसरीची त्रिमूर्ति
पाहिजे. आपण हें लक्षांत ठेविलें पाहिजे की, हिंदु समाजाच्या ह्या दोन आधारस्तंभांनी उभयतांस हितकर होईल, असें वर्तन ज्याप्रमाणे आजपर्यंत ठेविलें तसेंच पुढेहि ठेविलें पाहिजे." (केसरी लेख, खंड १ ला, १८-९-९४).
शिवाजी-उत्सव सुरू करण्यांत टिळकांचा हाच हेतु होता. सर्व हिंदु समाजाचें ऐक्य! त्यांनी त्यासंबंधी विवेचन करतांना सांगितलें आहे की, "राष्ट्रांतील महापुरुषांचें स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगलें साधन आहे. शिवाजीमहाराजांनी मराठे, ब्राह्मण, परभू, शेणवी असा भेद न करतां "गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिगं न च वयः ।" या न्यायाने सर्वांस एकराष्ट्रीयत्वाच्या जाळ्यांत आणलें, त्यामुळे त्यांचें स्मरण सर्वांस विशेष श्रेयस्कर होईल यांत शंका नाही. शिवछत्रपतींचा उत्सव करणाऱ्यांनी उत्सवाचा हा हेतु ध्यानांत ठेवून त्यांत कोणताहि जातिभेद मानतां कामा नये. यंदाचे उत्सवांत एक-दोन ठिकाणी असला प्रकार झाल्याचे ऐकिवात आहे. ही जर गोष्ट खरी असेल तर वेळींच तिचा बीमोड झाला पाहिजे." (केसरी लेख, खंड १ ला, पृ. ५३२, ३३).
लोकांत ऐक्याची वृद्धि होण्यास एक उपास्यदैवत असणें हें मोठें साधन असून गणेशोत्सवाचा तोच हेतु होता, हें मागे एके ठिकाणीं सांगितलेच आहे. स्वधर्माचा अभिमान जागृत करणें हाहि त्यांत हेतु होता. त्या संबंधांतच टिळकांनी म्हटलें आहे की, "स्वधर्माच्या श्रेष्ठत्वाचा ज्यास अभिमान वाटत नाही त्यास स्वराष्ट्राच्या श्रेष्ठत्वाचा तरी अभिमान कोठून वाटणार? धर्मोन्नतीचा व धर्माभिमानाचा जर राष्ट्रीय अभ्युन्नतीशी कांही संबंध असला तर तो याच प्रकारचा होय." (केसरीतील लेख खंड १ला, पृ. ४८८).
लो. टिळकांना धर्मजागृति करावयाची होती ती राष्ट्रजागृतीसाठी होय, हें यावरून स्पष्ट होईल.
हिंदी राष्ट्र
पण त्यांच्या धर्मजागृतीच्या या प्रयत्नामुळे त्यांच्यावर अनेक लोकांनी अनेक आक्षेप घेतले होते. हिंदु धर्माची जागृति म्हणजे अन्य धर्मीयांचा द्वेष, असें समीकरणच कित्येकांच्या मनांत होतें. इंग्रज सरकार तर जाणूनबुजून तसा त्यांच्यावर आरोप करीत असे. सरकारला हिंदु-मुसलमानांत दुही माजवावयाचीच होती. तेव्हा टिळकांचें हें धर्मजागरण आणि त्यांचा हिंदुत्वाचा अभिमान यांचा त्यांनी विपर्यास करावा हें युक्तच होतें. पण स्वतःस पुरोगामी म्हणविणाऱ्या अनेक हिंदु नेत्यांनीसुद्धा असा विपर्यास चालविला होता.
लो. टिळकांना भारतांत राष्ट्र निर्मावयाचें होतें तें हिंदी राष्ट्र होय. हिंदु, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम हे सर्व धर्म त्यांतील पंथ-उपपंथ, ह्या सर्वांचें एक राष्ट्र त्यांना घडवावयाचें होतें. असें असतांना हिंदुधर्मीयांचेंच ऐक्य करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा हें विसंगत नाही काय, अशी शंका त्यांच्या भक्तांना सुद्धा येत असे.