Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्माचं पुनरुज्जीवन । २५१

मतांची चर्चा करून, इतर धर्मातील सिद्धान्तांशी तुलना करून, आधार, प्रमाणे कारणें देऊन, चिकित्सक बुद्धीला पटेल अशा रीतीने, कर्मयोगशास्त्र सांगितलें.
ऐक्यबंध
 धारणात् धर्म इत्याहुः, धर्मो धारयते प्रजाः ॥ प्रभवार्थाय भूतानां धर्मस्य नियमः कृतः । यः स्यात् प्रभवसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ॥ अशा प्राचीनांनी धर्माच्या व्याख्या केल्या आहेत. ज्याने धारण होतें तो धर्म, ज्याने उत्कर्ष साधतो तो धर्म, असा त्यांचा अर्थ आहे; पण गेली अनेक शतकें हा अर्थ हिंदुस्थानांतून लुप्तच झाला होता. ऐहिक उत्कर्षाचा, समाजाच्या भरण-पोषणाचा, उन्नति-अवनतीचा धर्माशीं कांही संबंध आहे, हेंच येथील धर्मधुरीणांना मान्य नव्हते. लो. टिळकांना हा संबंध पुन्हा प्रस्थापित करावयाचा होता आणि त्या प्राचीन व्याख्यांतील भावार्थाचें पुनरुज्जीवन करावयाचें होतें. त्यासाठीचं देव व देश एकच आहेत, असें त्यांनी सांगितलें. आणि त्यासाठीच धर्म हा सर्वांना एकत्र संघटित करणारा ऐक्यबंध असावा, असे प्रतिपादन त्यांनी वारंवार केलेलें आहे.
 'गणपति उत्सव' या लेखांत ते म्हणतात, "पुण्यांतील गणपतीचा यंदाचा उत्सव फक्त ब्राह्मणांनी केला नसून, त्यांत सर्व हिंदूंचा हात आहे व याबद्दल जितका अभिमान वाटणें साहजिक आहे तितका सर्वांस वाटत आहे. साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार देखील, या सर्व जाती क्षणभर आपापला जातिमत्सर सोडून परस्परांशी एका दिलाने व एका धर्माभिमानाने मिसळल्या (ही आनंद मानण्यासारखी गोष्ट असतांना) यांत खेद करण्याजोगी काय गोष्ट झाली?" (केसरी, १८-९-१८९४).
 त्या वेळी पुराणवादी लोकांनी गणपति उत्सवावर असा आक्षेप घेतला होता की, सार्वजनिक उत्सव करण्यांत गणपतीला विटाळ होऊन तो रागावतो. (त्या वेळीं प्लेगची साथ आली ती गणपतीच्या कोपामुळेच आली, असें पुण्यांत पुष्कळ लोकांनी वाटत असे.) यावर टिळकांनी एका व्याख्यानांत सांगितले की, "लोक जमल्याने देवाला विटाळ होतो म्हणणे म्हणजे देवाने माणसें उत्पन्न केली नाहीत, असें म्हणण्यासारखें आहे. वेदांत चार वर्ण आहेत. ब्राह्मण मुखाच्या ठिकाणीं, क्षत्रिय बाहूच्या ठिकाणी, वैश्य ऊरूच्या ठिकाणी व शूद्र चरणाच्या ठिकाणी आहेत. मग डोक्याला काय पायाचा विटाळ होतो किंवा बाहूला पायाचा विटाळ होतो? असें धरल्यास आधी डोकें तोडून निराळे ठेवावें लागेल." (व्याख्यान, पृ. २६).
 गणेशोत्सव हा फक्त ब्राह्मणांचा आहे असा प्रवाद उठवून ब्राह्मण व मराठे यांच्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न त्या वेळीं सरकार करीत असे. त्यासंबंधी लिहितांना टिळक म्हणतात, "कांही हिंदु-धर्माची नालस्ती करणाऱ्या ब्राह्मणविद्वेषी लोकांनी मराठे आणि ब्राह्मण ह्यांच्यांमध्ये फूट पाडून सर्व हिंदुसमाजाचें अकल्याण करण्याच्या प्रयत्नास सुरुवात केली आहे. करिता आपण सर्वत्रांनी या वेळी सावध राहिले