२५० । केसरीची त्रिमूर्ति
यांना शंकराचार्यांच्या गादीवर आरूढ व्हावें, असा आग्रह टिळकांनी केला व त्यांनी तो मानला हें प्रसिद्धच आहे.
एकवाक्यता अनिष्ट
नव्या धर्माचें प्रवचन पाश्चात्त्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने, आधिभौतिक शास्त्रांच्या आधारे, बुद्धीला पटवून देण्याच्या हेतूने झाले पाहिजे अशी धारणा असल्यामुळेच लो. टिळकांनी गीतेवरचें त्यांचें गीतारहस्य हें जें प्रवचन तें सर्वस्वी त्या पद्धतीने केलेलें आहे. जुन्या शास्त्री पंडितांची शब्दप्रामाण्यपद्धति त्यांना सर्वस्वी त्याज्य वाटत असे. अनेक श्रुतिवचनें स्मृतिवचनें पाहतां असें दिसतें की, त्यांचे अर्थ परस्परांहून अगदी भिन्न आहेत, परस्परविरोधीहि आहेत. अशा वेळी कोणतें वचन ग्राह्य, कोणतें त्याज्य, हें स्वतःच्या बुद्धीने ठरविणें हाच उपाय असतो; पण स्वतःच्या बुद्धीने विचार करणें व एखादें श्रुतिवचन त्याज्य ठरविणें हें जुन्या शास्त्री- पंडितांना पाप वाटे, अब्रह्मण्यं वाटे. म्हणून तें श्रुति-स्मृतिवचनांतील शब्दांची, अर्थाची वाटेल ती ओढाताण करून त्या सर्वांचा अर्थ एकच आहे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत. टिळकांना ही पद्धति मान्य नव्हती. त्यांनी म्हटलें आहे की, "याचा परिणाम असा होतो की, वेदसंहितेपासून तो पुराणांपर्यंत एकच अर्थ प्रतिपाद्य मानल्यामुळे वैदिक धर्म हा ज्याच्या-त्याच्या सांप्रदायाप्रमाणे एकच उभा सोट आहे, शाखापल्लव फुटून वाढलेला वृक्ष नव्हे, अशी लोकांची समजूत होते; आणि मग दुसऱ्याचा सांप्रदायिक सोट खरा वैदिक नसून, माझीच सांप्रदायिक सोट खरा वैदिक होय, असे तंटें उपस्थित होतात... तेव्हा निरनिराळ्या वचनांची एकवाक्यता करतांना एक मुख्य आणि इतर ओढाताणीने तदर्थक बनविण्यापेक्षा देश-काल- वर्तमानादि परिस्थिति- भेदामुळे एकाच वैदिक बीजापासून निघालेल्या वृक्षास अनेक शाखा फुटणें शक्य आहे, असें समजून त्याप्रमाणे सर्व वचनांची व्यवस्था लावणें हें आमच्या मतें ऐतिहासिकदृष्ट्या व धर्मदृष्टचाहि अधिक समंजस व वस्तुस्थितीला अनुरूप आहे," गीतारहस्यावरील टीकाकारांना उत्तर देतांना टिळकांनी हा विचार मांडलेला आहे. (केसरी, २६-१०-१९१५).
स्वतंत्र चिंतन
लोकमान्यांनी गीतारहस्य लिहितांना हीच पद्धति अनुसरली होती. उपनिषदांतील बहुसंख्य उपनिषदें संन्यासमार्गी आहेत; कांही थोडीं कर्मयोगमार्गी आहेत. पण त्यांतील वचनांची एकवाक्यता करण्याचा मुळीच प्रयत्न न करतां त्यांनी त्यांतील भिन्न मतें आहेत तशीं मांडून स्वतःला ग्राह्य काय तें स्पष्टपणे सांगितलें आहे. उपनिषदें म्हणजे प्रत्यक्ष श्रुति! त्यांच्या बाबतींतहि टिळकांनी प्रामाण्य मानले नाही. मग शंकर, रामानुज, मध्व, वल्लभ ह्या आचार्यांची भाष्यें त्यांनी मानली नाहीत यांत नवल काय? तीं भाष्यें त्यांच्या बुद्धीला पटेनात म्हणून तर त्यांनी स्वतंत्र बुद्धीने विचार करून गीतेचा अर्थ लावला आणि कांट, ग्रीन इत्यादि पाश्चात्त्य पंडितांच्या