Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्माचें पुनरुज्जीवन । २४९

या एकाच विचाराने सबंध हिंदुस्थान आज हलत राहिलें पाहिजे." (आठवणी, खंड ३, पृ. १२९).
पाश्चात्त्य पद्धति
 लो. टिळकांना कोणत्या धर्माचें पुनरुज्जीवन करावयाचें होतें तें यावरून स्पष्ट होईल. प्राचीन वैदिक धर्मांत अनेक पंथ होते, शाखा होत्या, मतमतांतरें होती. त्यांतून हिंदुस्थानच्या उत्कर्षास पोषक अशी तत्त्वें निवडून काढून त्यांचें पुनरुज्जीवन करावें असा त्यांचा हेतु होता; आणि हें पुनरुज्जीवन नव्या, शास्त्रीय, पाश्चात्त्य पद्धतीने झालें पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
 नव्या पद्धतीने म्हणजे काय? शास्त्रीय पाश्चात्त्य पद्धति कोणती? बुद्धिवादाची, विचारस्वातंत्र्याची, तर्क, अनुभव, इतिहास यांच्या आधारें आपलें प्रमेय सिद्ध करण्याची.
 जुनी पद्धति शब्दप्रामाण्याची, केवळ सिद्धान्त सांगण्याची आज्ञा करण्याची होती. गीतारहस्यांतील उपसंहार या प्रकरणांत टिळकांनी म्हटले आहे की, "मन्वादि स्मृतीतून व उपनिषदांतून सत्य, अहिंसा यांविषयीच्या आज्ञा किंवा आचार स्पष्टपणें नमूद केलेले आहेत; पण मनुष्य हा ज्ञानवान प्राणी असल्यामुळे वरच्यासारख्या नुसत्या विधानांनी त्याचें समाधान न होता, हे नियम घालून देण्याचें कारण काय हे समजून घेण्याची त्याला स्वभावतः इच्छा होते."
 ही त्याची इच्छा तृप्त करून नव्या राष्ट्र-धर्माचीं तत्त्वें त्याच्या बुद्धीला पटवून दिली पाहिजेत, म्हणजेच या धर्माचें प्रवचन शास्त्रीय पद्धतीने केलें पाहिजे, असें टिळक निक्षून सांगत असत.
 ते म्हणत, "शिकलेल्या लोकांवर धर्मतत्त्वांचें वजन पाडण्यास नव्या तऱ्हेने या विषयाचे प्रतिपादन झालें पाहिजे व त्यांच्यापुढे पाश्चात्त्य पद्धतीने धर्माचें विवेचन करून त्याचें श्रेष्ठत्व त्यांस पटविलें पाहिजे." टिळकांचें असें मत असल्यामुळेच ते स्वामी विवेकानंद, अभेदानंद, ॲनी बेझंट यांचा मनःपूर्वक गौरव करीत. "आधि-भौतिक शास्त्रांच्या प्रसाराने ख्रिस्ती धर्माच्या मांडणीत पुष्कळ फेरफार झाला आहे व तशा प्रकारचा फेरफार हिंदु धर्माच्या मांडणींत होणें जरूर आहे", असें त्यांचें मत होतें.
 जुनी धर्मतत्त्वें, जुने आचार, रूढि, संस्था यांचीहि नव्या काळाला अनुसरून पुनर्रचना केली पाहिजे व त्यांना कार्यक्षम बनविलें पाहिजे, असें त्यांचें धोरण होतें. शंकराचार्यांच्या पीठासंबंधी बोलतांना ते म्हणाले, "जगद्गुरुंच्या जागीं नवीन तऱ्हेने शिकलेला इसम पाहिजे म्हणजे तो पुष्कळ कार्य करील. त्यांतून हल्लीच्या काळीं त्या मनुष्यास इंग्रजी आलेंच पाहिजे. परिस्थितीप्रमाणे या गोष्टी आता झाल्याच पाहिजेत. इंग्रजी शिकल्याशिवाय आपल्या धर्माचें वजन चोहोकडे पाडतां यावयाचें नाही. धर्माचें वजन पाडण्यास तुलनारूपाने त्याचें विवेचन केलें पाहिजे." डॉ. कुर्तकोटी