Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४८ । केसरीची त्रिमूर्ति

साधन आहे, असें संत म्हणत, एवढाच फरक. याला अपवाद म्हणजे समर्थ रामदासस्वामी. त्यांनी कर्ममार्गाचें खरें महत्त्व शुद्ध व प्रासादिक मराठींत सांगितलें आहे. पुढे महाभारताच्या गद्यात्मक भाषांतराच्या आधारे कर्मयोगाच्याच तत्त्वांचा अभ्यास मराठेशाहींत सुरू होता; पण कर्मयोगाचें हें पुनरुज्जीवन आमच्या दुर्दैवाने फार दिवस टिकलें नाही. (गीतारहस्य, पृ. ४९९).
 प्रवृत्तिमार्गाच्या आश्रयावांचून देश वैभवशाली होणें शक्य नाही. अशी टिळकांच्या मनाची निश्चिति असल्यानेच त्यांनी त्या मार्गांचें पुनरुज्जीवन करण्यासाठी 'गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र' हा अगविख्यात ग्रंथ लिहिला, आणि हिंदी राष्ट्राच्या उन्नतीची चळवळ दृढ पायावर उभी केली.
टाळकुटे
 देव आणि राष्ट्र यांच्या अद्वैताची, म्हणजेच कर्मयोगाची ही शिकवण आपल्या समाजाला किती अवश्य होती, हें विनायक नारायण जोशी (साखरेबुवा) यांनी दिलेल्या आठवणीवरून घ्यानीं येईल. (खंड ३ रा, पृ. १०१). आध्यात्मिक ग्रंथांचें चिंतन करून ज्ञानेश्वरमहाराजांच्या ग्रंथांवर व्याख्यान लिहावें, असा आपला विचार आहे, असें साखरेबुवांनी लोकमान्यांस सांगितलें; तेव्हा ते म्हणाले, "ते ग्रंथ तर लिहाच पण त्याशिवाय धार्मिक विषयावर स्वदेशाचे कल्याण करण्याविषयी लोकांत जागृति उत्पन्न होईल, अशीं व्याख्यानें देण्यास तुम्ही सुरुवात करा." त्यावर साखरेबुवा म्हणाले की, "तें माझ्या हातून होणार नाही; मला ही तुमची देशकल्याणाची दिशाच मान्य नाही. यापेक्षा शेकडो पटींनी जास्त पुण्य प्राप्त करून घेण्याचा उपाय ज्ञानेश्वरमहाराज, शंकराचार्यादिकांनी सांगितला आहे; त्याचें आचरण करणें अधिक श्रेयस्कर आहे."
 हे ऐकून लोकमान्य रागावले आणि म्हणाले, "तर मग तुम्ही खांद्यावर पताका घेऊन पंढरीस जाणार आणि वाळवंटांत टाळ कुटीत बसणार तर! हेंच ना तुमच्या अध्ययनाचें फल? तुम्ही आपल्या प्रवचनांत ब्रह्म सत्य, जगन्मिथ्या, अशी नुसती बडबड केल्याने, पारतंत्र्याच्या दुःखांत होरपळत असलेल्या हिंदुस्थानांतील लोकांस त्यापासून यत्किचित् तरी गारवा येईल का? मी म्हणतों यांपैकी तुम्हांस कांही पटत नाही, याचेंच मला आश्चर्य वाटतें. अध्यात्म-विचाराचा विषय अजीबात सोडून द्या, असें माझें मुळीच म्हणणे नाही. फक्त त्या विषयाचा उपयोग देशकल्याणाकडे करा एवढेच माझें सांगणें आहे."
 पंढरपुरास एकदा लोकमान्यांचें व्याख्यान झालें. दुसऱ्या दिवशीं तेथील एक उत्पात ह. भ. प. दत्तबुवा भुजंग त्यांना म्हणाले, "आपले एखादें व्याख्यान धर्मावर होतें तर बरें होतें." त्यावर लोकमान्य म्हणाले, "धर्मावरच कालचें माझें, व्याख्यान झालें. माझा धर्म स्वराज्य मिळविण्याखेरीज दुसरा नाही. स्वराज्य कसें मिळवावयाचें