Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्माचे पुनरुज्जीवनं । २४७

ही हिंदुस्थानची भूमि परकीय जुलमांतून सोडविण्यासाठी आणि सनातनधर्म रक्षिण्यासाठी आहे. म्हणून तींत भगवंताचे अधिष्ठान आहेच आहे." (आठवणी खंड १ ला ज. स. करंदीकर - आठवण, पृ. १४९). वासुदेव विठ्ठल दास्ताने यांनी अशाच प्रकारची आठवण दिली आहे. त्यांचे भुसावळचे एक मित्र टिळकांना म्हणाले की, "आज पंचवीस-तीस वर्षे इतक्या परिश्रमाने चळवळ चालली आहे; पण यश येत नाहीं तेव्हा भगवंताचें अधिष्ठान नाही म्हणून तर अपयश येत नसेल ना? आपल्या चळवळींत ईश्वराची पूजा-अर्चा, भजन, आराधना कांही होत आहे का? आपणांस त्यांत वेळ खर्च करतां येत नाही. त्यामुळे भगवंताचे अधिष्ठान मिळत नाही, म्हणून असें होत नसेल ना?" त्यावर टिळक म्हणाले, "माझी चळवळ हेंहि आराधनेचेंच स्वरूप आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांत निमग्न राहणे हीच उत्कृष्ट आराधना होय. ईश्वरचितनांत असतांना जें सुख, जी शांति मिळते त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला घ्यावयास सापडत आहे." (आठवणी खंड २, पृ. ३१३). पंढरपूरच्या वारकऱ्यांना "तुम्ही राष्ट्रोन्नतिरूप मोक्ष मिळवा", असा उपदेश टिळकांनी केल्याचें वर एकदा सांगितलेच आहे. १९०७ सालच्या एका व्याख्यानांत त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की "मोक्ष ज्याने मिळेल तेवढाच धर्म, अशी आमच्या धर्माची तरी व्याख्या नाही." (व्याख्यानें, पृ. २७).
गीतारहस्य
 धर्म आणि राजकारण, देव आणि देश, भगवंताचे अधिष्ठान आणि स्वराज्याची चळवळ हें जें अद्वैत लो. टिळकांनी निरनिराळ्या व्याख्यानांतून आणि लेखांतून प्रतिपादिलें तेंच अतिशय व्यापक तत्त्वज्ञानाच्या रूपाने त्यांनी गीतारहस्यात प्रतिपादिले आहे. लोकमान्यांनी धर्माचें खरें पुनरुज्जीवन केलें तें हेंच. गीतारहस्याच्या उपसंहारात त्यांनी असें दाखवून दिलें आहे की, निवृत्ति मार्ग, हा प्रथम उपनिषत्कारांनी वे सांख्यांनी प्रचारांत आणला. तत्पूर्वीचा वैदिक धर्म प्रवृत्तिपरच होता. "संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत जीं वर्णने आहेत त्यांवरून हा मार्ग (कर्मयोग) आमच्या देशांत अनादिकालापासून चालत आला आहे असें सिद्ध होते. किंबहुना एरवी हा देश कधीच वैभवशाली झाला नसता." (पू. ४९४).
प्रवृत्तिमार्ग
 या प्रकरणांत पुढे त्यांनी प्रवृत्तिमार्ग किंवा कर्मयोग याच्या चढउताराचा इतिहास थोडक्यांत दिला आहे. उपनिषदानंतर श्रीकृष्णांनी प्रवृत्तिमार्गाचें पुनरुज्जीवन केलें. मध्यंतरी जैन, बौद्ध यांच्या काळीं पुन्हा संन्यासमार्गाचा, संसारत्यागाचा प्रभाव वाढला; पण स्मृतिकारांनी पुन्हा वैदिक कर्मयोगाचें पुनरुज्जीवन केलें; पण पुढे शंकाराचार्य, रामानुज, मध्व इत्यादि सर्व आचार्यांनी संन्यासपक्ष स्वीकारून त्याचाच उपदेश सर्व देशभर केला. भागवतधर्मीय संत मंडळीहि कर्मयोगाला गौणच लेखीत. कर्मयोग हें संन्यासमार्गाचें अंग आहे, असें म्हणण्याऐवजी तें भक्तिमार्गाचे अंग किंवा