२४६ । केसरीची त्रिमूर्ति
जोडी कशी घालावयाची हें रामदासांनी शिकविलें. घराचें दार बंद करून उपासना केली की संपलें. घराबाहेर कोणाचेंहि राज्य असो, बाहेर वाटेल त्या आपत्ति येवोत, त्यांचा धर्माशीं कांही संबंध नाही, असा एक पूर्वी समज असे. राजकीय व्यवहार, देशाची कल्पना, यांचा धर्मात अंतर्भाव होत नाही, अशा प्रकारची कल्पना किंवा कुकल्पना आमच्यांत शिरली होती; पण रामदासांनी हिंदु धर्माचं पुनरुज्जीवन केलें. या धर्मांत असें तत्त्व आहे की, ज्याला मोक्षप्राप्ति पाहिजे असेल त्यास आपल्या देशबांधवांची काळजी केल्याखेरीज गत्यंतर नाही. जे आपल्या देशाकडे पाहत नाहीत, 'जे का रंजले गांजले त्यांस' आपले म्हणत नाहीत, आपले हजारो देशबांधव विपत्तीत असतांना जे नाक धरून घरांत बसतात, ते ढोंगी आहेत, अशा प्रकारची बुद्धि उत्पन्न करणें म्हणजे राष्ट्र जिवंत करणें आहे." (व्याख्यानें, पू. १५२, १५३).
लो. टिळकांनी हिंदु धर्माचें पुनरुज्जीवन केलें याचा हा अर्थ आहे. देश व धर्म हे अभिन्न आहेत, अशा प्रकारची बुद्धि निर्माण करून त्यांना हिंदी राष्ट्र जिवंत करावयाचें होतें. वरील दोन व्याख्यानांत पुनः पुन्हा हा भावार्थ त्यांनी मांडला आहे. "धार्मिक व राजकीय उत्सव आपणांस विभक्त करतां येणार नाहीत. शरीराच्या डाव्या-उजव्या अंगांप्रमाणे ते चिकटलेले आहेत", "समर्थांचे शिष्य घरोघर हिंडत व लोकांस स्वातंत्र्याचा व मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवीत असत,' "पारतंत्र्यामध्ये व्यापार, हिंमत, उमेद ह्या सर्व बाजूंनी देशाचा ऱ्हास झालेला असतो. अशा वेळी देश वर आणण्यास केवळ धर्मं-बुद्धि असून चालत नाही," "रामदासांनी महाराष्ट्रांत जागृति केली म्हणजे लोकांना गंध लावायला शिकविलें, असा अर्थ नाही. तुकारामांनाहि हा अर्थ अभिप्रेत नव्हता. उच्च कल्पना, अत्युच्च कल्पना लोकांस शिकवून त्या त्यांच्यांत खेळू देणें, जातिजातींतील भेद नाहीसे करून आपण सारे एकच आहों, असें वाटावयास लावणें हें खरें धर्म-शिक्षण होय. इंग्रजी तत्त्ववेत्त्यांनी ही तत्त्वें सांगितली आहेत, आणि तीं आपल्या उपयोगाचीं आहेत. हीं तत्त्वें पूर्वी आपल्यांत होती; पण तीं आपण विसरलो आहों." (व्याख्यानें, पृ. १४४).
ही जीं विसरलेलीं तत्त्वें, हा जो खरा धर्म त्याचें टिळकांना पुनरुज्जीवन करावयाचें होतें. लोकांना या धर्माचें शिक्षण द्यावयाचें होतें.
भगवंताचे अधिष्ठान
लोकमान्य विलायतेस जावयास निघाले तेव्हा त्यांना ब्रह्मवृन्दातर्फे पानसुपारी झाली. त्या वेळच्या भाषणांत चळवळीला भगवंताचे अधिष्ठान असणें म्हणजे काय तें त्यांनी स्पष्ट केलें. "चळवळीच्या कचेरींत एखादी मूर्ति बसवून तिच्या पुढे धूप जाळला म्हणजे तेथे भगवंताचे अधिष्ठान होतें असें नाही. भगवंताचें जगांत कार्य काय, तर साधूंचें रक्षण, दुष्टांचें निर्दालन व धर्माची स्थापना. ही कार्ये जेथे चालली असतील तेथे भगवंताचें अधिष्ठान आपोआपच आलें. आमची होमरूलची चळवळ