Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-४-

धर्माचे पुनरुज्जीवन


जीवनोद्देश
 अरविंदबाबूंनी टिळकांच्या जीवनोद्देशाचें अत्यंत समर्पक वर्णन केलें आहे. "हिंदी राष्ट्राचें पुनरुज्जीवन करणें, त्याला त्याच्या गतकालाप्रमाणे, किंबहुना शक्य असल्यास जास्तच वैभवशाली व उज्ज्वल करणें, हाच टिळकांचा जीवनोद्देश होता. तेवढ्यासाठी त्यांना नुसती राजकीय जागृतीच करावयाची नसून, सुप्तावस्थेंत असलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला, पूर्वकालावर त्याच्या भविष्यकालाचें अधिष्ठान ठेवून, खडबडून जागे करावयाचें होतें. टिळकांनी आपल्या आयुष्यांत जे जे उद्योग केले त्याचा साक्षात् अथवा परंपरेने ह्या राष्ट्रसंवर्धनाकडेच संबंध पोचतो."
 लो. टिळकांच्या जीवितकार्याचं यापेक्षा जास्त यथार्थ वर्णन कोणाला करतां येईल, असें वाटत नाही. राष्ट्रसंवर्धन, राष्ट्राचें पुनरुज्जीवन, हिंदुस्थानचें राष्ट्र या तत्त्वावर संघटन!
देव-देश-अद्वैत
 त्यांनी हिंदुधर्माचें पुनरुज्जीवन केलें तें यासाठीच. यासाठी त्यांनी पहिला महत्त्वाचा विचार सांगितला तो हा की, धर्म व राजकारण दोन नाहीत. देश आणि देव हे भिन्न नाहीत. "देश आणि देव हे दोन मानणारे जे लोक आहेत ते सर्व प्रकारे धर्मभ्रष्ट आहेत असें मी समजतों," असें ते म्हणत. २५ व २६ फेब्रुवारी १९०८ ह्या दोन दिवशीं लो. टिळकांचीं पुण्याला व सोलापूरला दासनवमीनिमित्त दोन व्याख्याने झाली. त्यांत समर्थांच्या कार्याचें विवेचन करतांना त्यांनी या विषयीचें आपलें तत्त्वज्ञान स्पष्टपणे मांडलें आहे. ते म्हणतात, "धर्म आणि व्यवहार यांची