Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४४ । केसरीची त्रिमूर्ति

शांत आणि विशेषतः निष्काम कर्तव्यास प्रवृत्त करणारा यासारखा बालबोध ग्रंथ संस्कृतांतच काय पण जगांतील इतर वाङ्मयांतहि सापडणें दुर्मिळ होय."
 हें प्रारंभीचें विधान झाले. त्यानंतर ग्रंथाच्या अभ्यंतरांत अनेक ठिकाणीं कांट, ग्रीन, कोंट इत्यादि पाश्चात्त्य पंडितांचे तात्त्विक, आध्यात्मिक व नीतिविषयक सिद्धान्त व उपपत्ति देऊन, त्या गीतेच्या तुलनेने कशा अपुऱ्या, असमाधानकारक व म्हणूनच अग्राह्य आहेत, हें दाखवून गीतेंतील तत्त्वज्ञानाचें श्रेष्ठत्व टिळकांनी सिद्ध केलें आहे; आणि 'गीतेचें बहिरंग-परीक्षण' या शेवटच्या प्रकरणांतहि प्रथम गीतेचा काळ निश्चित करून मग गीतेंतले अनेक विचार व तत्त्वें, यहुदी धर्म, ख्रिस्ती धर्म किंवा पायथागोरससारखे ग्रीक पंडित यांच्याकडून घेतलेलीं आहेत, अशा तऱ्हेचे पाश्चात्य पंडितांचे जे प्रवाद त्यांचे खंडन करून ते धर्मच गीतेचे ऋणी असण्याचा जास्त संभव आहे, हा विचार मांडून, पुन्हा त्या दृष्टीने गीतेचें श्रेष्ठत्व संदेहातीत करून ठेविलें आहे.
 वैष्णवांचे गुरु श्रीसत्यध्यानतीर्थ यांच्याशी चर्चा करतांना लोकमान्य एकदा म्हणाले की, "मी असें स्पष्ट सांगतों की, अनेक हेतूंप्रमाणे राजकारणाकरिताहि मी गीतारहस्य लिहिले आहे." (आठवणी खंड २, पृ. ११०) आपल्या प्राचीन परंपरेचा अभिमान जागृत करून हिंदी जनतेला स्वातंत्र्यसंग्रामासाठी सिद्ध करणें हें तें राजकारण होय.
 गीतारहस्यच काय, पण टिळकांचा प्रत्येक ग्रंथ, त्यांची प्रत्येक चळवळ, त्यांची प्रत्येक संस्था या राजकारणासाठीच होती. प्राचीन परंपरेचा अभिमान हा त्यांनी चालविलेल्या या यज्ञांतील अग्नीच होता.