Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राचीन परंपरा । २४३

त्यांत तत्त्वज्ञान आहे, इतिहास आहे, समाजव्यवस्था आहे. युद्धकला आहे. अशा प्रकारचा सर्वांगसुंदर व सर्वोपजीव्य झालेला दुसरा ग्रंथ संस्कृत वाङ्मयांतच काय, पण इतर देशांच्याहि वाङमयांत आढळत नाही." (केसरीतील लेख, खंड ४, पृ. ४३१, ४३२).
कणाद, कपिल
 एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी जॉन डाल्टन या प्रसिद्ध युरोपीय शास्त्रज्ञाने परमाणुवादाचा सिद्धान्त मांडला व त्याच शतकाच्या उत्तरार्धात चार्लस डार्विन याने आपला विकासवादाचा सिद्धान्त मांडला. हे दोन्ही सिद्धान्त विज्ञानाच्या इतिहासांत युगप्रवर्तक ठरले आहेत. गीतारहस्यांतील 'कापिलसांख्यशास्त्र व क्षराक्षरविचार' या प्रकरणांत त्यांचा उल्लेख करून टिळकांनी म्हटले आहे की, "भारतांत प्राचीन काळीं कणादाने परमाणुवाद सांगितला होता व कपिलाने विकासवाद किंवा गुणपरिणामवाद प्रस्थापित केला होता." आणि हें सांगून ते पुढे म्हणतात की, "अर्वाचीन काळीं भौतिक शास्त्रज्ञांना ज्या युक्त्या व जीं साधनें उपलब्ध आहेत तीं प्राचीन भारतीय दर्शनकारांना मुळीच उपलब्ध नव्हती. तरी सृष्टीची वाढ किंवा घटना कशी असावी याबद्दल सांख्यशास्त्रकारांनी दिलेल्या तात्विक सिद्धान्तांत आणि अर्वाचीन आधिभौतिक शास्त्रांच्या तात्त्विक सिद्धान्तांत फारसा भेद नाही, ही आश्चर्य करण्याजोगी गोष्ट आहे."
 प्रत्येक ठिकाणी लोकमान्य टिळकांना प्राचीन हिंदु संस्कृतीचें असामान्यत्व, असाधारणत्व, अद्वितीयत्व, श्रेष्ठत्व प्रस्थापित करावयाचें आहे आणि तें दाखवून मृतवत् झालेल्या हिंदुसमाजांत ईर्षा निर्माण करावयाची आहे, त्याला उत्साह यावयाचा आहे. त्यावांचून तो राष्ट्रपदवीला जाणें अशक्य होते.
 वेद, महाभारत, कणादकपिलांची दर्शने यांचें विवेचन करतांना लो. टिळकांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचें श्रेष्ठत्व सिद्ध केलें. मग श्रीमद्भगवद्गीतारहस्य हा जो त्यांच्या आयुष्यांतील मौलीभूत ग्रंथ त्यांत हा विचार, हा सिद्धान्त पुनःपुन्हा मांडलेला आढळला तर त्यांत कांहीच नवल नाही. गीतारहस्य हा ग्रंथ प्रामुख्याने प्रवृत्ति-धर्माचें अथवा कर्मयोगाचें विवेचन करण्यासाठी लिहिलेला आहे; पण प्राचीन भारतीय संस्कृतीचें असाधारणत्व भारतीयांना दाखवून देणें व त्यांना संजीवनी देऊन राष्ट्रकार्यास प्रवृत्त करणें हा टिळकांच्या सर्व उद्योगाचा ध्रुवतारा असल्यामुळे, तसे विचार त्यांनी गीतारहस्यांत पदोपदी मांडलेले आहेत.
असा ग्रंथ
 पहिल्या प्रकरणाच्या आरंभींच त्यांनी गीतेच्या अद्वितीयत्वाविषयी पुढील विधान केलें आहे. "पिंडब्रह्मांडज्ञानपूर्वक आत्मविद्येचीं गूढ व पवित्र तत्वें थोडक्यांत, पण असंदिग्धरीतीने सांगून, त्यांच्या आधारें मनुष्यमात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची ओळख करून देणारा... व संसारांत भांबावून गेलेल्या मनास