२४२ । केसरीची त्रिमूर्ति
बरोबर त्यांतील सर्वांना एक प्रकारची ईर्षा, एक प्रकारचा उसाह, एक प्रकारचा आवेश निर्माण झाला पाहिजे." (व्याख्यानें, पृ. २८).
गणेशोत्सव, शिवाजीउत्सव यांचा या दृष्टीने विचार केलाच आहे. आता त्यांच्या जगविख्यात ग्रंथांचा याच दृष्टीने विचार करून हें प्रकरण संपवूं.
मृगशीर्ष
लो. टिळकांनी वेदकालनिर्णय केला आहे. आपल्या 'मृगशीर्ष' अथवा 'आग्रहायणी' अथवा 'ओरायन' या ग्रंथांत त्यांनी असें सिद्ध केलें आहे की, वेदरचना ही इ. पू. ५००० वर्षे या सुमारास पूर्ण झाली. हा सिद्धान्त त्यांनी ज्योतिर्गणिताच्या साह्याने मांडला आहे. त्यापूर्वी पंडित मॅक्समुल्लर याने वेदकाल हा इ. पू. १२०० वर्षे असा ठरविला होता. डॉ. हो याने इ. स. पू. २४०० असा निश्चित केला होता. त्यांनी आपले सिद्धान्त भाषाशास्त्राच्या आधारें मांडले होते. त्यांना ज्योतिर्गणितपद्धति मान्यच नव्हती. त्यांचें म्हणणें असें की, त्या पद्धतीने कालनिर्णय करण्याच्या दृष्टीने पाहतां दक्षिणायन व उत्तरायण यांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म हालचालींच्या ज्ञानाची उपलब्धि असणें, हें ऋग्वेदकाळीं शक्यच नव्हतें. हें ज्ञान त्या वेळच्या ऋषींना होतें याचा पुरावा वेदांत मुळीच सापडत नाही. पण लो. टिळकांनी ऋग्वेदांतल्या ऋचा देऊनच त्या पंडितांचें मत खोडून काढले. आपला प्रबंध त्यांनी इतका साधार व सप्रमाण लिहिला की, हळूहळू, नाखुषीने का होईना, पाश्चात्त्य पंडितांना तो स्वीकारावा लागला. आणि त्यामुळे वेदवाङमय हेंच जगांतलें प्राचीनतम वाङ्मय होय, हें सिद्ध झालें व त्या अतिप्राचीन काळी सुद्धा भारताची संस्कृति अत्यंत प्रगल्भ दशेला पोचली होती, याविषयी वाद राहिला नाही. हिंदी जनतेची मान यामुळे जगांत उंचावली यात शंकाच नाहीं.
राष्ट्रीय महाकाव्य
कुलगुरु चिंतामणराव वैद्य यांनी 'महाभारत ए क्रिटिसिझम' असा एक ग्रंथ लिहिला होता. त्याचें लोकमान्यांनी केसरींत विस्तृत परीक्षण केलें होतें. त्यांतील पहिल्याच लेखांत त्यांनी महाभारताची थोरवी वर्णन केली आहे. "देशांतील थोर प्राचीन ऐतिहासिक पुरुषांचें उदात्त चरित लोकांस सांगून त्यांच्या वंशजांत शौर्य, अभिमान, सत्यनिष्ठा, धर्म-बुद्धि वगैरे अनेक सूक्ष्म सद्गुण जागृत करणारें प्राचीन काव्य जेथे उपलब्ध आहे, तेथे तेथे तें राष्ट्रीयत्वाचें प्रधान अंग मानले गेलें आहे... राष्ट्रांतील सर्व लोकांस एकसमयावच्छेदेकरून आनंद, ज्ञान, ईर्षा किंवा उत्साह देणारें प्राचीन महाकाव्यासारखें दुसरें साधन मिळणे कठीण आहे. आमच्या देशांतील महाभारत आणि रामायण हीं दोन अशीं प्राचीन महाकाव्यें आहेत." ह्या दोन्ही महाकाव्यांना पहिल्यापासून आर्ष महाकाव्यें म्हणण्याचा परिपाठ आहे. ह्यांतील महाभारत या ग्रंथाची थोरवी आता सर्वमान्य झाली आहे. कारण "महाभारतांत नीति आहे, धर्म आहे. मानवी कर्तव्याचा सशास्त्र विचार त्यांत आहे.