प्राचीन परंपरा । २४१
सामर्थ्य आमच्या ठायीं आहे, आम्ही हीन दर्जाचे नाही, हा भाव उदित होऊन मनावरचें मालिन्य झटकून जातें.
अस्मिता
श्रीस्वामी विवेकानंद समाधिस्त झाले त्या वेळी त्यांच्या कार्याचा टिळकांनी त्यांच्यावरच्या मृत्युलेखांत गौरव केला. त्यांत हीच विचारसरणी आहे. पाश्चात्त्य आमच्यापेक्षा सर्व दृष्टींनी श्रेष्ठ आहेत, ते आमचे गुरु आहेत, आमच्या उद्धारासाठी परमेश्वराने त्यांना हिंदुस्थानांत धाडलें आहे, ही दैवी योजना आहे, अशा तऱ्हेचे विचार येथले मोठमोठे विचारी पुरुष मांडीत होते. असें असतांना पाश्चात्त्य देशांतील सर्वश्रेष्ठ देश जो अमेरिका तेथे जाऊन सर्व जगाच्या धर्मपरिषदेत 'हिंदु धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे' हा सिद्धान्त एका हिंदु संन्याशाने जगज्जेत्या लोकांच्या गळीं उतरवावा व 'विवेकानंद म्हणजे परमेश्वराचा अवतार आहे', 'विवेकानंद म्हणजे ख्रिस्ताची मूर्ति आहेत', असे धन्योद्गार त्यांच्या मुखी आणावे यापेक्षा जास्त चैतन्यप्रद, स्फूर्तिप्रद, उत्साहदायक काय असूं शकेल? "स्वामींनी आमच्यावर अनंत उपकार करून ठेविले आहेत", असें टिळकांनी म्हटलें आहे तें याच कारणासाठी. हिंदी राष्ट्राच्या अस्मितेला त्यांनी संजीवनी दिली; आणि ती प्राचीन धर्म-तत्त्वांच्या वेदान्ताच्या, पुनरुज्जीवनाने!
आत्मप्रत्यय
लो. टिळकांनी भारताच्या प्राचीन वाङ्मयाचा अतिशय सखोल अभ्यास करून त्यावर अनेक ग्रंथ लिहिले, निबंध लिहिले, इतरांनी लिहिलेल्या ग्रंथांची परीक्षणे केली. याच्या मागे अनेक हेतु असले तरी त्यांतील प्रधान हेतु एकच होता. या भरतभूमीचें, तिच्या प्राचीन वैभवाचें, तिच्या धर्माचें, तिच्यांतील थोर पुरुषांचें, त्यांच्या तत्त्वचिंतनाचें, कर्तृत्वाचें, प्रज्ञेचें, बुद्धिमत्तेचें श्रेष्ठत्व सिद्ध करणें आणि तें हिंदी जनतेला व जगाला दाखवून देणें हा तो हेतु होय. प्राचीन परंपरेचा असा अभिमान जागृत झाल्यावांचून समाजांत जोम येत नाहीं, चैतन्य येत नाही, त्याची मरगळ जात नाही, त्याच्या ठायीं आत्मविश्वास जागृत होत नाही, आत्मप्रत्ययाचा स्फुल्लिंग त्याच्या मनांत झगझगत नाही, अशी त्यांच्या बुद्धीची निश्चिति होती.
टिळकांच्या प्राचीन परंपरेच्या अभिमानाचा अर्थ आपण समजून घेत आहोत. तो अभिमान म्हणजे विशिष्ट आचार- विचार- रूढि यांचा अभिमान नव्हे, तर येथील थोर पुरुषांच्या कर्तृत्वाचा, प्रज्ञेचा, बुद्धिमत्तेचा, एकंदर गुणसंपदेचा अभिमान होय. स्वत्वाचा अभिमान तो हाच. स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश यांचा अभिमान म्हणजेच हा परंपरेचा अभिमान होय. याच अर्थाने त्यांनी एका व्याख्यानांत "ज्याला वेदादि ग्रंथपरंपरा मान्य आहे तो हिंदु झाला', असें सांगितलें आहे. (व्याख्यानें, पृ. २९). "या अभिमानाचें महत्त्व काय? 'हिंदु' हा शब्द उच्चारल्या-
के. त्रि. १६