२४० । केसरीची त्रिमूर्ति
वाटेल त्या गोष्टी स्वीकारणें ही आमची फार दिवसांपासूनची प्रवृत्ति आहे. हिंदूंवर अनेक वादळें आलों... तरी आमचा धर्म आज जिवंत आहे, हें हिंदु धर्माच्या अंगीं असलेल्या लवचिकपणाचें फल होय." (व्याख्यानें, पृ. ३०). "आम्हांला धर्मदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या वळण पाहिजे आहे," असें 'आमचें कर्तव्य' या व्याख्यानांत त्यांनी म्हटलें आहे (पृ. ५०). म्हणजे या तीनहि क्षेत्रांत परिवर्तन होणें त्यांना अवश्य वाटत होतें. मग सातत्य, अखंडत्व कशांत राहिलें? याच व्याख्यानांत ते पुढे म्हणतात, "तुमच्या धर्मांतील जिवंतपणा व तेज आणि तुमची ऐतिहासिक परंपरा लक्षांत घेतां तुम्हांला अपयश कधीहि येणार नाही, अशी माझी खात्री आहे."<br?हे ज्ञात होतें
सुप्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ग्रंथांच्या आधारें मराठींत श्री. ना. ल. फडके यांनी 'अज्ञेय मीमांसा' असा ग्रंथ तयार केला होता. त्याचें परीक्षण करतांना लो. टिळकांनी, प्रथम हे अवघड कार्य केल्याबद्दल फडके यांची प्रशंसा केली आणि नंतर त्यांच्यावर अशी टीका केली की, स्पेन्सरसाहेबांचे सिद्धान्त स्पष्ट करतांना आमच्या प्राचीन ऋषींनी अशाच तऱ्हेचे तत्त्वविचार पूर्वी सांगितले होते, हा विचार त्या ग्रंथांत सांगून, त्या दोन तत्त्वविचारांतील साम्य-वैषम्याचा विचार फडके ह्यांनी केला नाही; तो करावयास हवा होता. कारण तसें न केल्यामुळे, हा कांही तरी नवीनच विचार आपण ऐकत आहोंत, आपल्याकडे असें प्रगल्भ तत्त्वज्ञान पूर्वी नव्हतें, असा समज होतो आणि तसा समज होणें अगदी अनिष्ट आहे. टिळक म्हणतात, "हे आधुनिक काळचे ऋषिवर्य आम्हांस पूज्य व वंद्य आहेत; पण त्यामुळे आम्ही आपल्या पूर्वीच्या ऋषिवर्यांस विसरून केवळ स्पेन्सर- साहेबांचे पोवाडे गात बसावें हें आम्हांस बरें वाटत नाही." (केसरींतील लेख, खंड ४, पृ. २४०).
मालिन्य झटकले
लो. टिळकांनी ही टीका केली त्या वेळीं (इ. स. १८९६) तर तिचें महत्त्व फार होतें. हिंदुस्थानांतील जनतेचा आत्मप्रत्यय त्या वेळी नष्ट होण्याची वेळ आली होती. इंग्रजांच्या आक्रमणामुळे, पारतंत्र्यामुळे, आणि त्यांच्या भौतिक, वैज्ञानिक संस्कृतीच्या दीप्तीमुळे आपल्या हिंदी समाजाचा तेजोभंग झाला होता. पाश्चात्त्यांच्या तुलनेने, आपण फारच हीन दर्जाचे लोक आहों, असा भाव त्यांच्या मनांत येत होता. अशा वेळीं हें मनोमालिन्य नष्ट करण्याची फार आवश्यकता होती. आणि त्याला उपाय एकच. एके काळी आम्हीहि पराक्रमी, कर्तृत्वशाली होतों, हर्बर्ट स्पेन्सरसारख्या जगविख्यात तत्त्ववेत्त्यासारखें गहन तत्त्वचिंतन करण्याचें सामर्थ्य आमच्या ठायींहि होतें, ही जाणीव जागृत करणे हाच तो उपाय होय. पूर्वी आम्ही पराक्रमी होतों या जाणिवेने आजहि तोच पराक्रम करण्याचे