Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राचीन परंपरा । २३९

पारमेष्ठ्य
 याच व्याख्यानांत राष्ट्रजागृतीचा हा मार्ग सांगून 'स्वराज्या'चा संबंध त्यांनी प्राचीन परंपरेशी जोडून दिला आहे. ते म्हणाले, "गणपतीची आराधना करतांना स्वराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य राज्य, अधिराज्य, हें मागण्याची आपली पूर्वापार चाल आहे. हे शब्द ज्या मंत्रांत आहेत ते मंत्र प्राचीन आहेत. तुम्ही त्या शब्दांचा अर्थ विसरून गेला होता. ही कल्पना पुन्हा आठवावी म्हणून बंगाल्यांतील चळवळ झालेली आहे... तुमच्या यत्नांचा लय अखेरीस पारमेष्ठ्यांत होईल. (व्याख्यानें पृ. ५४).
राष्ट्रीय उत्सव
 हे दोन्ही उत्सव नव्या पद्धतीने व्हावे याबद्दल टिळकांचा कटाक्ष होता. हिंदु धर्मांत सण व उत्सव पुष्कळ आहेत; पण ते बहुतेक घरगुती आहेत. सार्वजनिक नाहीत. पंढरीच्या विठोबाच्या यात्रेसारखे कांही उत्सव सार्वजनिक आहेत, पण हे उत्सव अथवा यात्रा पुरातन असल्याने त्यांचें स्वरूप आपणांस पाहिजे त्या रीतीचें करणें अशक्य नसलें तरी बहुतेक असाध्य आहे. तेव्हा ती उणीव भरून काढण्यासाठी हे राष्ट्रीय उत्सव सुरू केलेले आहेत. गणेशोत्सवाप्रमाणेच शिवाजीउत्सवाविषयीहि त्यांनी असाच विचार मांडलेला आहे. ते म्हणतात, "कित्येकांस अशी धास्ती आहे की, शिवाजी-उत्सव लवकरच रामनवमीच्या थाटावर जाईल व त्यापासून फारसें हित होणार नाही, परंतु असल्या शंका निराधार आहेत. शिवाजीमहाराज अवतारी पुरुष असले तरी त्यांचा उत्सव आम्ही करतों, तो ते मार्गदर्शक थोर पुरुष होते म्हणून करतों. अवतारी पुरुष होते या दृष्टीने नव्हे, ही गोष्ट सर्वांनी लक्षांत ठेविली पाहिजे. रामजयंतींत व शिवजयंतींत भेद आहे तो हाच होय. रामचंद्रांनी वानरांच्या साह्याने लंका घेतली ही गोष्ट आता पौराणिक झाली; पण श्रीशिवाजीमहाराजांनी मावळ्यांच्या साह्याने मराठी राज्याची स्थापना केली ही गोष्ट पौराणिक होऊं शकत नाही. हीं त्यांच्या कृतीचीं फलें जोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर आहेत, तोपर्यंत शिवजयंतीचा उत्सव केवळ दैविक पुरुषांच्या उत्सवाप्रमाणे होईल अशी भीति बाळगण्याचे कारण नाही." (केसरीतील लेख, खंड १ला, पृ. ४८७, ५३१) लोकमान्यांना परंपरेचा अभिमान जागृत करावयाचा होता तो स्वराज्यासाठी, अधिराज्यासाठी, पारमेष्ठ्यासाठी, हें यावरून स्पष्ट होईल. म्हणूनच त्यांना महत्त्व वाटे तें त्या चैतन्याचें, बाह्य आचाराचें नव्हे!
 आचार, विचार, रूढि, तत्त्वें, संस्था, धोरणें बदलली तरी परंपरेचा त्याग केला, असें होत नाही. त्या प्राचीन वैभवाचें, कर्तृत्वाचे, गुणसंपदेचें आम्ही वारस आहों, ही जाणीव- तिचें रक्षण- म्हणजे परंपरेचें रक्षण होय. 'हिंदु धर्मांतील एकी व सहिष्णुता' या व्याख्यानांत टिळक म्हणतात, "आमच्या परंपरेला विरुद्ध न जातां- आणि ही मर्यादा अत्यंत महत्त्वाची आहे.- ज्या गोष्टींचा स्वीकार करणें इष्ट