Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३८ । केसरीची त्रिमूर्ति

राहतो! बिल् ड्युरँट याने म्हटल्याप्रमाणे, मी कोण, ही जाणीव मनुष्याला सतत कायम राहणें अवश्य असतें. ती क्षणमात्र ढळली तर तो वेडा ठरेल. व्यक्तीच्या ठायीं या मी-च्या जाणिवेचें जें महत्त्व तेंच परंपरेच्या जाणिवेचें, स्वत्वाच्या सातत्याचें, पूर्वजांच्या अभिमानाचें राष्ट्राच्या, समाजाच्या ठायीं महत्त्व आहे. लो. टिळकांच्या परंपरेच्या अभिमानाचा हाच अर्थ आहे.
 वरील व्याख्यानाचा समारोप करतांना ते म्हणाले, "स्वार्थ, भीति, यांनी प्रेरित झालेल्या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देतां, पूर्वजांचे पराक्रम आठवून त्यांचेंच रक्त आपल्या अंगांत खेळत असून, त्यांनी केलेली कर्तबगारी करून दाखविण्याचें सामर्थ्य आपणांत आहे, अशी मनाची खात्री ठेवून काम केल्यास परमेश्वर आपणांस यश देईलच देईल."
ऐक्याची वृद्धि
 लो. टिळकांच्या प्रत्येक कार्यामागे भारतांत एकराष्ट्रीयत्व निर्माण करणें हेंच उद्दिष्ट होतें; आणि त्या एकराष्ट्रीयत्वासाठी पाश्चात्य विद्या व संस्कृति यांचे साह्य त्यांना जसें अवश्य वाटत होते तितकीच, किंबहुना एका दृष्टीने त्यापेक्षा जास्त, भारतीय परंपरेच्या अभिमानाची जागृति हीहि त्यांना अवश्य वाटत होती. परंपरेचा अभिमान हा राष्ट्र-संघटनेचा त्यांना प्राणच वाटत होता. शिवाजीउत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे, असें ते आग्रहाने सांगत त्याचें हेंच कारण आहे. गणेशोत्सवहि त्यांनी याच दृष्टीने सुरू केला होता. 'यंदाचा गणपत्युत्सव' या लेखांत ते म्हणतात, "कोणत्याहि लोकांत ऐक्याची वृद्धि होण्यास जीं अनेक साधनें असतात त्यांपैकीच एक उपास्यदैवत असणें हें एक कारण आहे... आणि वर्षांतून दहा दिवस तरी एकाच देवतेच्या भजन-पूजनांत लोक निमग्न झाल्याने त्यांच्यांत ऐक्याची वृद्धि होणार नाही, असें कोण म्हणेल?" अशा भजन-पूजनांतून स्वधर्माचा अभिमान जागृत करणें व त्यांतूनच राष्ट्रभक्तीची शिकवण देणें हें त्यांचें उद्दिष्ट होतें. कारण, ते म्हणतात, "स्वधर्माच्या श्रेष्ठत्वाचा ज्यांस अभिमान वाटत नाही त्यांस स्वराष्ट्राच्या श्रेष्ठत्वाचा तरी अभिमान कोठून वाटणार?" (केसरीतील लेख, खंड १, पृ. ४८७).
 'गणेशोत्सवाचा समारोप' या व्याख्यानांत टिळकांनी राष्ट्रीय जागृतीसाठी, स्वराज्यप्राप्तीसाठी हा उत्सव आहे, हें स्पष्ट केलें आहे. ते म्हणाले, "हा उत्सव दहा दिवस आहे. त्यानंतर वर्षभर तुम्ही काय करणार? माझें असें सांगणें आहे की, हजारो वर्षे जी गोष्ट तुम्ही भोगलीत ती गोष्ट- स्वराज्य– गेल्याबद्दल तुमच्या मनाला चटका लागेल, असे कांही करा." असें कांही करावयाचें म्हणजे काय करावयाचें? तर "गणपतीच्या विसर्जनानंतर स्वदेशी व बहिष्कार ही वाळू येथून नेऊन तुम्ही आपआपल्या घरांतून पसरावी व बहिष्काराचे शत्रु हे जे उंदीर त्यांपासून आपला बचाव करावा."