Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राचीन परंपरा । २३७

(व्याख्यानें, पृ. २३७), "शिवाजीने केलें तेंच आम्हांस करावयास सांगता की काय?" असा प्रश्न तेव्हा लोक विचारीत. शिवाजीने मुसलमानांशी लढाया केल्या. मराठ्यांनी बंगालवर स्वाऱ्या केल्या, तसें पुन्हा करावयाचें की काय?- असा या प्रश्नाचा भावार्थ आहे. त्यावर टिळकांचें उत्तर असें की, तसें नाही. शिवाजीमहाराज ही एक प्रेरणा आहे. स्फूर्ति आहे. कशीहि परिस्थिति आली तरी, आम्ही तिच्यावर मात करूं शकतों, हा विश्वास त्यांच्या स्मरणामुळे निर्माण होतो. टिळक म्हणतात, "शिवाजीने केलें तसें तसें तंतोतंत करा, असें आम्ही सांगतों म्हणूंन कोणाचा गैरसमज असल्यास तो काढून टाका. वैश्वदेवाचे वेळीं बापाचा कासोटा सुटत होता म्हणून मुलाने मुद्दाम सोडणें हें जितकें मूर्खपणाचें, तितकेंच हें मूर्खपणाचें आहे." मग शिवाजीचें स्मरण कशाला? त्याचा उत्सव कशाला?
आत्मविश्वास
 "निराशेच्या व अंधकाराच्या परिस्थितींतून आम्ही एकदा वर आलो. ती परिस्थिति ज्यांनी बदलली त्यांचे आम्ही वंशज आहों, त्यांचेच रक्त आमच्यांत खेळत आहे, तेव्हा आम्हीहि सध्याची निराशेची परिस्थिति बदलूं शकूं, हा आत्मविश्वास जोपासण्यासाठी महाराजांचा उत्सव करावयाचा. इतर देशांत थोर लोक झाले नाहीत असें नाही. अमेरिकेचा वाशिंग्टन तसा पुरुष होता; पण शिवाजींच्या धैर्याकडे पाहवयाचें तें एवढ्यासाठी की, शिवाजी आपल्यांतला असून त्याने महकार्य केलें. लॉर्ड कर्झन यांनी लॉर्ड क्लाइव्ह याच्या स्मारकाचा उपक्रम केला होता. त्यांना जितका क्लाइव्ह प्रिय त्यापेक्षा शिवाजीमहाराज महाराष्ट्राला शतसहस्र, नव्हे तर लक्षपट प्रिय असले पाहिजेत. स्वराज्य म्हणजे देशप्रीति, पराक्रम, परिस्थिति जिंकून पराक्रम करणें- हें शिवाजीच्या चरित्राचे रहस्य आहे. किंबहुना हा त्या चरित्राचा जीव की प्राण आहे."
मी - जाणीव
 परंपराभिमानाचा अर्थ यावरून स्पष्ट होईल. शौर्य, धैर्य, पराक्रम, स्वराज्याकांक्षा, कर्तृत्व, परिस्थितीवर मात करण्याची शक्ति माझ्या ठायीं आहे, असा आत्मप्रत्यय म्हणजे एकंदर मानवी गुणसंपदा हा समाजाचा प्राण होय. परंपरेच्या अभिमानाने हा प्राण टिकवितां येतो. म्हणून त्या अभिमानाचें देशाला महत्त्व. विशिष्ट रूढि, विशिष्ट आचार, किंवा त्या परिस्थितीमुळे उद्भवलेले शत्रु-मित्र-भाव, त्या वेळी अंगीकारलेली तत्त्वें ह्यांचें अनुकरण म्हणजे परंपरेचा अभिमान, असा अर्थ नाही. यामुळेच मुस्लिमांनीहि शिवाजी-उत्सवांत सहभागी व्हावें, असें टिळक सांगत. कारण शिवाजीमहाराज हें एक राष्ट्रीयत्वाचें प्रतीक होतें. बंगाली लोकांनी मोठ्या भक्तिभावाने शिवाजी-उत्सव केला तो याच कारणासाठी. पूर्वजांच्या उत्सवामुळे, महाभारत, रामायण, वेद-उपनिषदें या ग्रंथांच्या पठनाने, स्फूर्ति मिळते, चैतन्य भरतें, संजीवनी लाभते, आत्मविश्वास जागृत होतो. म्हणजेच समाज जिवंत