Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३६ । केसरीची त्रिमूर्ति

गौणत्व येते; पण टिळकांनी तें मान्य करून वेदांचा गौरव करणारा असा जो त्या श्लोकाचा सांप्रदायिकांनी लावलेला अर्थ तो त्याज्य ठरविला आहे. हें ध्यानांत घेऊनच त्यांच्या वेदप्रामाण्याचा अर्थ आपण केला पाहिजे; शिवाय, मागल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे, पाश्चात्त्यांच्या ज्या अनेक संस्थांचें व तत्त्वांचे अनुकरण करावयास त्यांनी सांगितले त्यांचे विवेचन करतांना त्यांनी वेदप्रामाण्याचा उल्लेख सुद्धा केलेला नाही, आणि इतरत्रहि कोठे, वेदवचन असें आहे म्हणून तुम्ही असें आचरण करा, असें चुकून सुद्धा त्यांनी सांगितलेलें नाही. तेव्हा वेदप्रामाण्य याचा, वैदिक परंपरेचा वारसा, तिचा अभिमान यापलीकडे कांहीच अर्थ त्यांच्या मनांत नव्हता हे उघड आहे.
 वेदांच्या अपौरुषेयत्वाचें असेंच आहे. वेद अर्थाच्या दृष्टीने नित्य-शब्दांच्या दृष्टीने नव्हे, आणि अतिप्राचीनत्वाच्या दृष्टीने अनादि, असा प्राचीन ऋषींनी अर्थ केला होता व त्याच दृष्टीने ते अपौरुषेय होत, असा खुलासा टिळकांनी केलेला आहे. पण त्याहिपेक्षा निर्णायक गोष्ट ही की, टिळकांनी वेदांचा कालनिश्चय केलेला आहे. इ. पू. ५००० च्या सुमारास वेदरचना पूर्ण झाली असा सिद्धान्त त्यांनी मांडला आहे. यावरून वेद अपौरुषेय नव्हते, आणि अनादीहि नव्हते असेंच त्यांचें मत होतें हैं दिसून येतें. वेदरचनाकर्ते पुरुष उत्तर ध्रुवाजवळ राहत होते, असें सांगतानाहि त्यांनी वेदांचें मानवी कर्तृत्व उघड उघड मान्य केलें आहे. त्या ऋषींच्या भौगोलिक परिस्थितीचें वर्णन त्यांत आहे, म्हणूनच उत्तर ध्रुवाचा सिद्धान्त त्यांना भांडतां आला. अपौरुषेयत्व किंवा परमेश्वरकर्तृत्व जर मानलें, तर विशिष्ट भौगोलिक परिस्थितीचा संबंधच येत नाही. शिवाय 'खाल्डियन वेद व अथर्ववेद' या प्रबंधांत त्यांनी खाल्डिया व भारत यांच्यांत त्या काळीं दळणवळण असलें पाहिजे व त्यामुळेच अथर्ववेदांत खाल्डियन वेदांतील कांही शब्द व कांही विचार आलेले आहेत, असा विचार मांडलेला आहे. यावरून तर वेदांचें मानवी कर्तृत्व त्यांना संपूर्णपणे मान्य होतें हें अगदी स्पष्ट होतें.
 जातिभेद, अस्पृश्यता या रूढि टिळकांना मान्य नाहीत. जन्मनिष्ठ, विषमता- मूलक चातुर्वर्ण्य त्यांना मान्य नाही. बालविवाहाची रूढि घातक आहे, असें ते म्हणतात. पुनर्विवाह करणाऱ्यांचे ते अभिनंदन करतात. शुद्धीचा ते पुरस्कार करतात. धर्मपरिवर्तनाचा आग्रह धरतात. वेदांचें प्रामाण्य व वेदांचें अपौरुषेयत्व हेंहि त्यांना मान्य नाही, आणि शंकराचार्यांच्या गीताभाष्याचे खंडन करून हजारो वर्षे हिंदु-मनावर असलेलें त्यांचे वर्चस्व त्यांनी नष्ट करून टाकलें. आणि तरीहि प्राचीन परंपरेचा त्यांना अभिमान होता, याचा अर्थ काय?
प्रेरणा व स्फूर्ति
 १९०८ सालीं अकोला येथे लो. टिळकांचे 'शिवाजीमहाराज व परिस्थितीचें बंड' या विषयावर व्याख्यान झालें. त्यांत त्यांनी याचा अर्थ स्पष्ट केला आहे.