Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राचीन परंपरा । २३५

टिळकांनी १८९० साली जें पत्रक काढलें होतें प्रसिद्धच आहे. चार-पांचशे लोकांनी एकत्र येऊन करार करून, मुलीचें लग्न सोळा वर्षांच्या आंत करूं नये, पुरुषाने चाळीसच्या पुढे लग्न केल्यास विधवेशीं करावें, विधवेचें वपन करूं नये, अशा कांही सुधारणांस स्वतः बांधून घ्यावें, असें तें पत्रक होतें; आणि टिळकांनी स्वतःच्या मुलीचा विवाह तिच्या वयाच्या पंधराव्या वर्षानंतरच केला. आनंदीबाई जोशी त्या काळांत अमेरिकेत जाऊन डॉक्टर होऊन आल्या त्या वेळी टिळकांनी त्यांचें मुक्तकंठाने अभिनंदन केलें व "आनंदीबाईंची मूर्ति शांतपणे सर्व कुलीन स्त्री-पुरुषांच्या हृदयांत निरंतन वास करील", असे त्यांच्याविषयी धन्योद्गार काढले.
 पतितपरावर्तन किंवा शुद्धि याला सनातन शास्त्री-पंडितांचा तीव्र विरोध होता व अजूनहि आहे; पण लो. टिळक शुद्धीचे पुरस्कर्ते होते. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्याशी बोलतांना ते एकदा म्हणाले, "हे आमचे जुने लोक खुळचटपणाचे वाद किती दिवस करीत बसणार आहेत, समजत नाही. जग किती धडाक्याने पुढे चाललें आहे. जो तो आपल्या धर्माची संख्या वाढवीत आहे; आणि आमचे शास्त्री-पंडित पाहवे तर पतितपरावर्तन योग्य की अयोग्य, याचा वाद—विवादच करीत बसले आहेत." (आठवणी खंड २, पृ. ११०). पण पतितांचें परावर्तन एवढ्याचाच टिळक पुरस्कार करीत असें नाही. धर्माच्या कोणत्याहि क्षेत्रांतील समाजाच्या प्रगतीला अवश्य जें परिवर्तन त्याचा ते नेहमीच पुरस्कार करीत. 'हिंदुत्व आणि सुधारणा' या लेखांत त्यांनी म्हटलें आहे की, "हिंदु धर्मांतील तत्त्वें सुधारणेस प्रतिकूल आहेत, असें नाही. असें असतें तर आजपर्यंत हिंदु धर्माने टिकावच धरला नसता व हिंदु राष्ट्रहि कायम राहिलें नसतें." याच भावार्थाने, "आता स्मृतिकार निर्माण झाला पाहिजे, स्मृति बदलण्याचा काळ आता आला आहे", असा विचार त्यांनी एकदा मांडला होता. (आठवणी खंड २, पृ. ४१९).
वेदांविषयी
 वेदांचें प्रामाण्य व वेदांचें अपौरुषेयत्व हीं दोन्ही लो. टिळकांना मान्य होतीं, असा एक समज रूढ आहे; आणि त्याला आधारहि आहे. हिंदु धर्माचें लक्षण सांगतांना त्यांनी 'प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु' असें पहिलेच लक्षण सांगितलें आहे. आणि प्रो. जिनसीवाले ह्यांनी वेद हे अपौरुषेय मानतां येत नाहीत, असा पक्ष मांडला असतांना, टिळकांनी उलटपक्ष घेऊन, वेद अपौरुषेय आहेत, असा विचार मांडला होता. पण असें जरी असले तरी प्रामाण्य व अपौरुषेयत्व यांचा जो रूढ अर्थ आहे, त्याअन्वये टिळकांना तीं तत्वें मान्य होतीं असें कधीच म्हणतां येणार नाही. गीतेच्या दुसन्या अध्यायांत "वेदवादरताः पार्थ", "यावानर्थ उदपाने" आणि "त्रैगुण्यविषया वेदाः" या श्लोकांत श्रीकृष्णांनी वेदांचा जो अधिक्षेप केला आहे तो टिळकांनी पूर्णपणे मान्य केला आहे. कांही उपनिषदांतहि वेदांतील यज्ञयागांचा अधिक्षेप आहे. त्यांचेहि टिळकांनी समर्थन केलें आहे. यामुळे वेदांना साहजिकच