२३४ | केसरीची त्रिमूर्ति
आक्षेप
प्रतिगामी, पुराणवादी याचा अर्थ स्पष्ट आहे. परंपरेने चालत आलेल्या जुन्या रूढि, त्या कालबाह्य झाल्या असल्या, समाजाला घातक ठरत असल्या तरी, अंधश्रद्धेने तशाच पुढे चालविल्या पाहिजेत, असा हट्टाग्रह धरणारा तो पुराणवादी होय. कर्मठ सनातनी याचा अर्थ असाच आहे. समाजांतल्या अनेक आचारांना कालांतराने अर्थ राहत नाही. त्यांतलें मूलतत्त्व नाहीसें झालेलें असतें. तरी अंधपणे ते आचार तसेच पाळत राहणारा तो कर्मठ सनातनी होय. पुनरुज्जीवनवाद तो हाच. इंग्रजीतील रिव्हायव्हॅलिझम या शब्दाचा तो मराठी प्रतिशब्द आहे. जुन्या पीठिका, परंपरा, रूढि यांचा त्या जुन्या म्हणूनच अभिमान धरणें, त्या पुराण आहेत म्हणूनच, साधु आहेत, असें म्हणणें, हा पुनरुज्जीवनवाद होय. लो. टिळकांनी संमतिवयाच्या कायद्याला केलेला विरोध, त्यांनी प्रार्थनासमाजावर केलेली टीका, रानडे, भांडारकर यांच्या अनेक आचारविचारांवर घेतलेले आक्षेप यांचा आधार घऊन, टीकाकारांनी टिळकांना वरील विशेषणे लावलेलीं आहेत.
पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांचे टिळक किती महत्त्व मानीत होतें, ती विद्या येथे आमच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली पाहिजे, याविषयी त्यांचा कसा आग्रह होता, प्रत्यक्षनिष्ठा, विचारस्वातंत्र्य, अनाग्रही-बुद्धीने केलेलें सत्य संशोधन या पाश्चात्त्य संस्कृतीच्या मूलतत्त्वांचा त्यांनी निश्चयाने कसा पुरस्कार चालविला होता, याचें मागील प्रकरणांत केलेलें विवेचन काळजीपूर्वक वाचलें तर टिळकांच्यावर कर्मठपणाचा, अंधश्रद्धेचा आरोप लोकांनी करावा, आज पन्नास वर्षांनंतरहि करावा, याचें आश्चर्य वाटेल; पण यासाठीच टिळकांच्या परंपरेच्या तत्त्वज्ञानाचें परीक्षण करणें अवश्य आहे.
परिवर्तनाचा पुरस्कार
जातिभेद, अस्पृश्यता, चातुर्वर्ण्य हा, सनातन्यांच्या मतें, हिंदु धर्माचा आत्मा होय. लो. टिळकांचें यांविषयी काय मत होतें? १९०७ साली बेळगाव येथे 'सरकारी शिक्षण व राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर त्यांचे भाषण झाले. त्यांत ते म्हणाले, "जातिभेद, जातिद्वेष, वा जातिमत्सर यांच्या योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे, याचेंहि ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळालें पाहिजे." "परमेश्वर अस्पृश्यता मानील तर मी परमेश्वरच मानणार नाही" हे त्यांचे उद्गार इतिहासाने नमूद केलेले आहेत. १८९१ सालीं डॉ. भांडारकर यांनी आपल्या गतभर्तृका कन्येचा पुनर्विवाह केला. तेव्हा टिळकांनी त्यांच्या मनोधैर्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलें व प्रत्यक्ष कृतिरूप सुधारणा करणें हाच सामाजिक सुधारणा करण्याचा खरा मार्ग होय, असे उद्गार काढले. १८९३ सालीं धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला त्या वेळी त्यांचेहि टिळकांनी अभिनंदन केलें व ते पानसुपारीलाहि गेले होते. बालविवाहाच्या संबंधांत