२३२ । केसरीची त्रिमूर्ति
अन्याय अमेरिकेत झाला तेव्हा अमेरिकेत क्रान्ति झाली; रशियांतील प्रोफेसरांनी, मजुरांनी, विद्यार्थ्यांनी, कारखानदारांनी, एडिटरांनी, दुकानदारांनी आपले म्हणणें धैर्याने, कशाचीहि परवा न करता, झारसाहेबांपुढे मांडले तेव्हा जगांतील सर्व बादशहांत प्रबळ असे हे बादशहा मट्ट्यास आले. हिंदुस्थानांतहि अशी लढाई जुंपण्याची चिन्हें दिसूं लागलीं आहेत." (केसरी, २८-११-१९०५). आयर्लंडांत लँडलीग म्हणून जी सभा आहे, त्या सभेने पुष्कळ जमीनदार लोकांस बहिष्कृत केलें आहे. अशाच तऱ्हेने जर या वेळेस आपल्याकडे बहिष्काराचे रूपांतर होईल तर त्यापासून पुष्कळच फायदा होईल."
लोकमान्यांना स्वराज्य हवें होतें तें पाश्चात्त्य धर्तीचे हवें होतें, हें वर सांगितलेंच आहे. त्यामुळेच राष्ट्रसभा, सार्वजनिक सभा, होमरूल लीग अशा पाश्चात्त्यांसारख्या संस्था स्थापून, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता, विचारस्वातंत्र्य इत्यादि पाश्चात्त्य संस्कृतीतील तत्त्वांचा अवलंब करून, आणि स्वदेशी बहिष्कार, करबंदी अशा मार्गांनी लोकांनी जागृत होऊन, त्याग करून, दंड, तुरुंग, मृत्यु या शिक्षा सोसून स्वराज्य मिळविलें तरच तें टिकविण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगी येतें हें त्यांनी जाणलें होतें. पाश्चात्त्य विद्या, पाश्चात्त्य संस्कृति व पाश्चात्य कार्यपद्धति यांविषयी त्यांचा आग्रह होता तो यासाठीच.