पाश्चात्य विद्या । २३१
पाश्चात्त्य धर्तीचें स्वराज्य
लोकमान्यांना शेती नवी हवी होती, उद्योग, वैद्यकशास्त्र नवें हवें होतें; आणि या जागृतींतून येणारें स्वराज्यहि नवें म्हणजे पाश्चात्त्य धर्तीचें हवें होतें. 'मराठा राष्ट्रीय संघा'तर्फे भरलेल्या सभेत लोकमान्य बोलत होते. ते म्हणाले, "आता आपल्याला पूर्वीचें स्वराज्य नको असून पाश्चात्त्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे आहे. आपल्या जातिभेदामुळेच येथे ब्रिटिशांचें राज्य स्थापन झालें आहे व जातिभेद असाच पुढे चालू राहणार असेल तर, स्वराज्यांतहि आमची अशीच अधोगति होईल." (आठवणी, २, २०३).
जाति-पंथ-धर्मभेदातीत स्वराज्य, म्हणजेच हिंदी लोकांचें राज्य लोकमान्यांना हवें होतें. राष्ट्रसंघटना ती हीच; आणि त्यासाठी शेतकरी, अस्पृश्य, रेल्वेकामगार, वैद्य, मठपति या राष्ट्रपुरुषांच्या सर्व अवयवांत ते संजीवनी भरीत होते. एका खाजगी बैठकीत ते म्हणाले, "प्रस्तुत चळवळ मी करीत आहें याचा खरा अर्थ ध्यानांत घ्या, मी आज लोकजागृति करीत आहे. मृतवत् झालेल्या देहांत संजीवन घालीत आहे... ज्या दिवशी स्वराज्याशिवाय जगणें शक्य नाही, ही भावना लोकांत मुरेल, तो दिवस खरा... तोंपर्यंत लोकांत अग्नि चेतविणे एवढेच महत्त्वाचें काम करणें. जरूर आहे.
पाश्चात्त्य आदर्श
पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति लोकमान्यांना किती प्रिय होती, हें यांवरून ध्यानांत येईल. राष्ट्र, लोकशाही, विज्ञानं या पाश्चात्य संस्कृतीच्या निष्ठा होत्या. समता, बंधुता, व्यक्तित्व, विचारस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, हीं तत्त्वें त्यांच्या बुडाशीं होतीं; आणि तीं सर्व पाश्चात्त्य विद्येतून निर्माण झाली होती. म्हणून स्वराज्याचें रूप ठरवितांना, चळवळीचे मार्ग, आखतांना, संस्था उभारतांना, संघटना करतांना पाश्चात्त्यांचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे, असें ते सांगत असत.
१९०८ सालच्या 'समेट कसा होईल' या लेखांत ते म्हणतात "पार्लमेंट सभेंत राष्ट्राचें हित कसें साधतात याचें प्रत्यक्ष उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे; मग राष्ट्रीय सभेत अमुक पक्षाचे लोक पाहिजेत, बाकीच्यांनी तेथे येण्याचें प्रयोजन नाही, असा आग्रह धरणें अनुदारपणाचें लक्षण नव्हे काय? मतभेदामध्ये मतैक्य, बेकीमध्ये एकी उत्पन्न करून राष्ट्रकार्य कसें साधावयाचें या प्रश्नाचा पाश्चिमात्य लोकांनी निकाल लावलेला आहे." वंगभंगाच्या चळवळीला उत्तेजन देतांना, टिळक म्हणतात, "शंभरापेक्षा अधिक वर्षांच्या शिक्षणाने बंगाली लोक इंग्रजी रीतीची चळवळ करण्यास शिकले आहेत, आणि त्यांनी जर संघशक्ति अशीच कायम ठेविली तर त्यांच्या चळवळीचा पगडा सरकारवर बसण्याचा संभव आहे. (केसरी, १५-८-१९०५). रशिया, अमेरिका, आयर्लंड या देशांतील चळवळीचीं उदाहरणें त्यांनी अशाच संदर्भात दिली आहेत. "मॅचेस्टरवाल्यांनी केला तसा