२३० । केसरीची त्रिमूर्ति
स्थापन करतात. आपण त्यांचें अनुकरण केलें पाहिजे. आपल्याकडे भांडवल नाही. एकेकटा मनुष्य कारखाने काढू शकणार नाही. तेव्हा सभा स्थापून भांडवल जमविणें यावांचून दुसरा तरणोपाय नाही. या सभा स्थापन करण्याचें काम ज्यांस इंग्रजी विद्येचा संस्कार झाला आहे अशाच लोकांनी प्रथम हातीं घेतलें पाहिजे; कारण त्यांच्या साह्यावांचून सभा स्थापन होणें अगदी अशक्य आहे; पण याआधी राजकीय सभा स्थापन झाल्या पाहिजेत. त्यांपासून मनुष्यास, एकत्र येऊन काम केल्याने किती फायदा होतो तें कळू लागतें. शिवाय जों जों अशा प्रकारची सभा मोठी असते तों तों तिचें अधिकाधिकच प्राबल्य होतें व सरकारासहि एक प्रकारची दहशत पडते. अशा रीतीने राजकारणी सभा स्थापण्याचें शिक्षण मिळाल्यावर उद्योगाच्या व व्यापाराच्या सभा स्थापणें सुलभ होतें." (वर्ष १, अंक ४९, ५०; केसरीतील निवडक निबंध, पहिलें पुस्तक, आवृत्ति २ री, पृ. २०८ - २१३ -दोन अंकांतील लेखांचा सारार्थ वर दिला आहे)." असा प्रयत्न इंग्रजी शिकलेल्यांनी केला पाहिजे. असे त्यांनी न केल्यास त्यांच्या देशहिताच्या संबंधाने सर्व गप्पा व्यर्थ जाणार आहेत व पाश्चात्त्य देशांतील लोक या देशास रानटी व सार्वजनिक कामांत उदासीन असें म्हणतात तें यथार्थ ठरणार आहे." (उक्त ग्रंथ, पृ. २१२).
या देशाचें हेंच मुख्य दुखणे होते. येथले प्रजाजन सार्वजनिक कामांत उदासीन होते. असे लोक राष्ट्र घडवूं शकत नाहीत. अशा या प्रजाजनांना राष्ट्रभक्तीची दीक्षा देणें हें लोकमान्यांचें मुख्य कार्य होतें.
नवी शेती, नवे उद्योग
राष्ट्रनिर्मिति करण्यासाठी टिळकांना या समाजपुरुषाच्या देहांतील प्रत्येक पेशी जागी करावयाची होती. या देहांतील प्रत्येक स्नायु चलनवलन करूं लागला पाहिजे, प्रत्येक वाहिनी, प्रत्येक धमनी आपलें जीवनरस वाहण्याचें काम उत्तम करूं लागली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. आपली शेती, या विषयावर बोलतांना, पांडुरंग गोपाळ बाळ महाजन यांना ते म्हणाले, "पूर्वीपासून चालत आल्याप्रमाणेच हे लोकशेती करतात; तींत सुधारणा म्हणून नाही. आपण सुधारणा करून इतरांच्या फायद्याकरिता तो अनुभव लोकांपुढे ठेवला पाहिजे." सांगलीला अस्पृश्यांतर्फे त्यांना मानपत्र देण्यांत आलें, त्या वेळी ते म्हणाले, "अस्पृश्यांनी शिक्षण घेतलें पाहिजे; पण तरी नोकरीच्या मागे त्यांनी लागूं नये. धंदा घाणेरडा म्हणून तो अपमानास्पद न मानतां, नवीन वळणावर त्याची सुधारणा करणें हेंच श्रेयस्कर. अस्पृश्य आपल्या धंद्याची सुधारणा करतील तेव्हाच त्यांचा उद्धार झाला असें मी समजेन." डॉ. मोतीराम वेलकर यांच्यापाशीं बोलतांना, स्वराज्य मिळाल्यावर अनेक प्रयोगशाळा काढून देशांतील वनस्पतींचें संशोधन करून, वैद्यकशास्त्रांत प्रगति करण्याचा आपला मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. कारण आता नुसतें कफ, वात, पित्त या कल्पनांना चिकटून चालणार नाही.