पाश्चात्त्य विद्या । २२९
म्हणतात, "आजन्म विद्या-व्यासंग व तत्त्व-विचार यांत आपला सर्व वेळ घालविणारे व स्वभावतःच वैराग्यशील व विगततृष्ण असे महापुरुष आपल्या देशांत प्राचीन काळी बरेच होत असत, परंतु ती प्रवृत्ति नाहीशी होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत, व इंग्रजी शिकलेल्या विद्वानांतहि वैराग्य, तत्त्वज्ञान, सतत विद्याव्यासंग, हे गुण अद्याप दृष्टीस पडूं लागले नाहीत." हें दुःख व्यक्त करून शेवटीं समारोप करतांना टिळकांनी कपिल, गौतम, कणाद, बुद्ध या प्राचीन तत्त्ववेत्त्यांशी स्पेन्सरसाहेबांची तुलना केली आहे व "असे पुरुष देशांत उत्पन्न होणें हेंच देशाच्या सजीवतेचें लक्षण होय" असें म्हटलें आहे. (केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. ३५७, ३६७).
राष्ट्राचे नागरिक
हिंदी समाज लो. टिळकांनी राष्ट्र या तत्त्वावर संघटित केला तो पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांच्या साह्याने केला, याचा अर्थ आता ध्यानांत येईल, असें वाटतें. राष्ट्रसंघटना याचा ढोबळ अर्थ सर्वांना माहीत असतो. ही संघटना धर्म- जाति-निरपेक्ष असते, ती वर्गभेद, प्रांतभेद मानीत नाही, एक ध्येय, एक राष्ट्रभाषा, एक परंपरा यांनी या संघटनेतील सर्व लोक एकजीव झालेले असतात, हीं तत्त्वें आता सर्वश्रुत झाली आहेत; पण याच्याहि पलीकडे एक अत्यंत महत्त्वाचें तत्त्व राहतें, त्याची जाणीव असावी तितकी लोकांना नसते. समाजांतील प्रत्येक माणसाला, सर्व समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी माझ्या शिरावर आहे, आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असले पाहिजे, अशी जेव्हा जाणीव असते तेव्हाच तो समाज राष्ट्रपदवीला जाऊं शकतो. ही जाणीव होणें म्हणजेच अस्मिता, व्यक्तित्व जागृत होणें; आणि राष्ट्राच्या नागरिकाचें व्यक्तित्व हे पहिले लक्षण होय. या व्यक्तित्वाची जागृति व परिपोष पाश्चात्त्य विद्येवांचून होणें शक्य नाही, हें लो. टिळकांनी प्रारंभीच जाणलें होतें. म्हणूनच पाश्चात्त्य विद्येच्या उपासनेसाठी त्यांचा अट्टाहास होता.
स्वावलंबन
राष्ट्रांतील प्रत्येक नागरिक सर्व समाजाची चिंता वाहण्यास समर्थ व्हावा यासाठी उपाय काय? राष्ट्रीय प्रपंचाची सर्व कामें स्वतःहून अंगावर घेणें व तीं पार पाडणें हा एकच उपाय यावर आहे. आमचे उद्योगधंदे बुडाले. ते सरकार काढणार नाही, ते आमचे आम्हीं काढले पाहिजेत. कारखाने आम्हीं काढले पाहिजेत, भांडवल आम्हीं जमविलें पाहिजे. हें काम एकट्यादुकट्याचें नाही, म्हणून पाश्चात्त्यांचे अनुकरण करून आम्हीं प्रत्येक कामासाठी सभा स्थापिल्या पाहिजेत. हा विचार टिळक केसरीच्या पहिल्या वर्षापासून सांगत होते. "युरोप-अमेरिकेच्या इतिहासापासून घेण्याजोगी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची सभास्थापनपद्धति होय. राजकीय सभा, सामाजिक सभा, अर्थव्यवहार करणाऱ्या सभा, धार्मिक सभा. (कंपन्या, बँका, पेढ्या यांना टिळकांनी सभाच म्हटलें आहे). पाश्चात्य लोक हरएक कामांत सभा