Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२८ । केसरीची त्रिमूर्ति

अद्यापहि पूर्ववत् झाली नाही, ही मोठया दुःखाची गोष्ट आहे. ग्रंथलेखनासाठी मॅक्समुल्लर यांस जी सवलत मिळाली ती दुसऱ्या कोणा विद्वानास मिळाली नसती असें नाही; पण त्यांच्यासारखी विद्याभिरुचि असणारा व एकनिष्ठपणें विद्याव्यासंग करणारा आमच्यामध्ये हल्लीच्या काळांत तरी कोणी नजरेस येत नाही, ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. हिंदुस्थानांतील आधुनिक विद्वानांनी प्रो. मॅक्समुल्लरांच्या चरित्रापासून जर कांही बोध घ्यावयाचा असेल तर तो हाच होय. राजकीय बाबतींत आम्हांस, आमच्या अंगी कितीहि गुण असले तरी, पुढाकार घेण्यास या राज्यांत संधि सापडणें कठीण आहे; पण विद्याव्यासंग, तत्त्वज्ञान, धर्मविचार किंवा शास्त्रीय शोध या बाबतींत आमच्या बुद्धीचा बराच उपयोग आम्हांस अद्याप करून घेतां येण्यासारखा आहे; व तेवढा जरी आमच्या विद्वानांनी करून घेतला तरी त्यापासून देशाचें पुष्कळ कल्याण झाल्याखेरीज राहणार नाही."
 हर्बर्ट स्पेन्सर या थोर पाश्चात्त्य पंडिताच्या अज्ञेयमीमांसेचें परीक्षण करतांना लो. टिळकांनी पाश्चात्त्य विद्या व पाश्चात्त्य विद्वान् यांचा असाच मुक्तकंठाने गौरव केला आहे. ते म्हणतात, "अलीकडे दोन-तीन शतकें ज्योतिषशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, विद्युच्छास्त्र वगैरे आधिभौतिक शास्त्रांची पुष्कळ अभिवृद्धि होऊन, जगांतील नैसर्गिक शक्तीने एकंदर पदार्थांचीं जीं स्थित्यंस्थरें किंवा रूपांतरे होतात त्यांचे नियम आपणांस अधिकाधिक कळत जाऊन, त्यापासून मनुष्यजातीचा अत्यंत फायदा झालेला आहे, ही गोष्ट सर्वांस निर्विवाद कबूल आहे." पाश्चात्त्य शास्त्रांचें असें महत्त्व सांगून, टिळकांनी त्या शास्त्रांच्या ज्ञानप्राप्तीच्या पद्धतीचें वर्णन केलें आहे. पाश्चात्त्य विद्येचें अनन्यत्व आहे तें त्या पद्धतींत आहे. "जड सृष्टीतील पदार्थांचें सूक्ष्म अवलोकन, तदंतर्गत गुणधर्माचें व्यवस्थित व सखोल विवेचन आणि परस्पर विभिन्न दिसणाऱ्या पदार्थांचें किंवा गुणधर्मांचें एकमेकांशी सदृशत्व किंवा विसदृशत्व समजणें हीं आता जशी सुगम झाली आहेत तश कधीहि झालेली नव्हती... त्याचप्रमाणे सर्व पदार्थांस सामान्यतः व्यापून असणारे दिक्कालादि पदार्थ अनादि व अनंत असले तरी, त्यांचा इतर पदार्थांशी कोणत्या प्रकारचा संबंध असतो, याचें अर्वाचीन शास्त्रांतून जितकें चांगलें विवेचन आहे, तितकें जुन्या ग्रंथांतून नाही व त्याचें कारणहि उघड आहे. गेल्या दोनशे-तीनशे वर्षांत आधिभौतिक शास्त्राची जी अभिवृद्धि झाली तिच्या योगाने हें ज्ञान आपणांस प्राप्त झालेलें आहे." (केसरींतील लेख, खंड ४ था, पू. ३०५). लो. टिळकांनी अत्यंत प्रांजल-बुद्धीने येथे पाश्चात्त्य विद्येची महती गायिली आहे. दिक्, काल हे तत्त्वज्ञानाचे विषय, पण त्यांचें स्वरूपहि अर्वाचीन शास्त्रांमुळे जास्त चांगलें स्पष्ट होतें, असें ते पूर्ण अनाग्रही वृत्तीने मान्य करतात, हे विचार त्यांनी १९०१ साली मांडले. त्यानंतर दोन वर्षांनी हर्बर्ट स्पेन्सर मृत्यु पावले. तेव्हा त्यांचा मृत्युलेख लिहितांना मॅक्समुल्लरसाहेबांच्या मृत्युलेखांतल्याप्रमाणेच त्यांनी उद्गार काढले आहेत. ते