Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाश्चात्य विद्या । २२७

शास्त्रांचीच नव्हे तर आमच्या उद्योगधंद्यांची व कलांचीहि हीच स्थिति झालेली आहे. उदाहरणार्थ, वस्त्रे विणण्याची किंवा रंगविण्याची कला घ्या. यांत आम्ही पुष्कळच प्रावीण्य व कौशल्य संपादन केलें होतें. पण पुढे त्यांची वाढ खुंटली. यूरोपियन लोकांस आमच्याकडून या कलेचें जें ज्ञान मिळालें तें याच स्थितींतलें होय; परंतु या वेळी युरोपीय राष्ट्रें जिवंत असल्यामुळे त्यांनी आमच्याकडून संपादन केलेल्या सदर कलांच्या ज्ञानांत भर घालून त्यांचा प्रवाह पुढे चालू ठेवला; आणि त्या कलांच्या साहाय्याने आपला देश श्रीमंत करून आम्हांस उलट भिकेस लाविलें. (वेदांताची आणि उद्योगाची दिशा, केसरींतील लेख, खंड ४ था, पु. ४८६).
 लो. टिळकांचीं हीं विवेचनें वाचतांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की, समाजाला जिवंतपणा यावयास हवा असेल, तर त्याने पाश्चात्त्यांप्रमाणे प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, दृक्प्रत्ययशरण अशा शास्त्रांचा अनाग्रही-बुद्धीने, केवळ सत्याकडे दृष्टि ठेवून, अभ्यास केला पाहिजे, हा सिद्धान्त त्यांच्या मनाशीं निश्चित झाला होता. आणि पाश्चात्त्य शास्त्रांच्या अध्ययनाने असे संस्कार हिंदी जनतेच्या मनावर व्हावेत, अशी त्यांना तळमळ लागलेली होती. 'दोन शब्दांत दोन संस्कृति' या आपल्या लेखांत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पाश्चात्त्य व पौर्वात्य संस्कृतींत जो भेद सांगितला आहे, तोच आजच्या काळाच्या दृष्टीने, लो. टिळकांना मान्य होता. पाश्चात्त्य संस्कृति प्रत्यक्षनिष्ठ आहे; आणि आपली पोथीनिष्ठ आहे, असें सावरकरांनी सांगितलें आहे. टिळकांच्या विवेचनाचा भावार्थ तोच आहे. म्हणूनच पाश्चात्त्य विद्येचा, आपण त्यांचे आदर्श डोळयापुढे ठेवून, अभ्यास केला पाहिजे, असें त्यांनी पुनः पुन्हा सांगितलें आहे.
पाश्चात्त्य ऋषि
 आणि हें केवळ भौतिक शास्त्रांच्या बाबतींत नव्हे, तर प्राचीन भारतीय जे वेदोपनिषदादि ग्रंथ त्यांच्याहि अभ्यासाच्या बाबतीत आपण पाश्चात्त्य पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे, असा टिळकांचा आग्रह होता. प्रो. मॅक्समुल्लर या थोर पंडिताचा मृत्युलेख टिळकांनी लिहिला आहे. त्यांत रॉथ, बॉप, वेबर, बुल्हर या पंडितांच्या कार्याचें महत्त्व सांगतांना ते म्हणतात, "त्यांनी प्राच्य-भाषा, प्राच्य-धर्म, या विषयांवर जे अनेक ग्रंथ लिहून ठेविले आहेत, ते इतके महत्त्वाचे आहेत की, प्राच्य-भाषांचा किंवा धर्म-ग्रंथांचा इतउत्तर जर कोणास सूक्ष्म व नव्या पद्धतीने अभ्यास करावयाचा असेल, तर या पाश्चात्त्य विद्वानांचे ग्रंथ वाचल्याखेरीज त्याच्या अध्ययनाची परिपूर्ति कधीहि व्हावयाची नाही." मॅक्समुल्लर यांच्याबद्दल तर टिळकांना इतका आदर होता की, त्यांनी त्यांना प्राचीन भारतीय ऋषिमुनींच्या पदवीला नेऊन बसविलें आहे, आणि म्हटलें आहे की, "विद्यादेवीची इतक्या एकनिष्ठपणे सेवा करणारे पंडित आमच्या देशांत प्राचीन काळीं पुष्कळ होत असत; व सायणाचार्यांसारखे तेराव्या शतकापर्यंत झालेले आहेत; पण मध्यंतरी ही परंपरा जी कमी झाली ती