२२६ । केसरीची त्रिमूर्ति
पाहिजे, असे त्यांचे मत होतें. पूर्वी ब्रह्मगुप्ताची अशीच वृत्ति होती. त्याने आर्यभट्टाच्या गणितास दोष दिलेले आहेत. तो म्हणतो, "ब्रह्मदेवाने सांगितलेले ग्रह-गणित महान् काळ गेल्यामुळे खिळखिळें झालें आहे. तें मी जिष्णुसुत ब्रह्मगुप्त स्पष्ट करून सांगतों." यावरून असें दिसतें की, ब्रह्मदेवाचें वाक्यहि जसेच्या तसें मानतां येत नाही, हें सांगण्याचें धैर्य त्या काळीं होतें. गर्गादि ग्रंथकार तर स्वच्छ म्हणतात की, "म्लेंच्छ, यवन यांनी स्थापिलेलें शास्त्र उत्तम आहे. तेव्हा त्यांनाहि ऋषींप्रमाणे पूज्य मानले पाहिजे." अशी वृत्ति असल्यामुळेच प्राचीन काळी आमचीं शास्त्रे जिवंत राहिली; पण पुढे ही वृत्ति पालटली. त्यामुळे शास्त्रांची वाढ खुंटली."
तेव्हा पुन्हा आपण त्या प्रत्यक्षनिष्ठ, दृक्प्रत्ययशरण- वृत्तीचा अवलंब केला पाहिजे, असा उपदेश टिळकांनी केला आहे. त्या काळीं जुन्या गणितग्रंथांच्या नियमाप्रमाणे चंद्र-सूर्य व इतर ग्रह यांचे अस्तोदय होत नसत. तेव्हा गणित चुकत होतें हें उघड आहे; पण अंधश्रद्ध लोक तें मान्य करून नवें गणित स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यामुळेच पंचांगाचा वाद माजून राहिला होता. या वेळी, "ज्योतिषाच्या गणिताची साक्ष प्रत्यक्ष आहे- 'प्रत्यक्षं ज्योतिषं शास्त्रं चंद्रार्कौ यत्र साक्षिणौ'- गणिताप्रमाणे चंद्र-सूर्य आकाशांत दिसतील तर तें गणित खरें, नाही तर खोटें" हा विचार टिळकांनी केसरींतून वारंवार मांडला. पाश्चात्त्य विद्येचा संस्कार आपल्या लोकांच्या मनावर व्हावा हाच त्यांतला हेतु होता.
अनाग्रह
वैद्यकशास्त्राचा विचार करतांना त्यांनी हीच विचारसरणी अवलंबिलेली होती. 'आर्यवैद्यकाचें पुनरुज्जीवन' या लेखांत ते म्हणतात, "आमचें जुनें वैद्यक नव्या वैद्यकापेक्षा कांही बाबतींत पुष्कळ मागे आहे, ही गोष्ट आम्हांस मान्य आहे. वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, इंद्रियविज्ञानशास्त्र, शारीरशास्त्र वगैरे वैद्यकीस उपयुक्त व आवश्यक शास्त्रांचा पश्चिमेकडील लोकांनी गेल्या एक-दोन शतकांत चांगला अभ्यास करून तीं शास्त्रे पुष्कळ पूर्णतेस नेली आहेत." हें सांगून टिळकांनी ज्योतिषशास्त्राप्रमाणेच प्राचीन काळचें भारतीय वैद्यकहि पुष्कळ प्रगत होतें, तेव्हा त्याचाहि अभ्यास करावा व प्राच्य आणि पाश्चात्त्य हा भेद न मानतां सत्याचें मधुकर-वृत्तीने ग्रहण केलें पाहिजे, असें तत्त्व सांगितलें आहे; आणि नंतर म्हटलें आहे की, "आग्रहास शास्त्रीय शोधांत जागा नाही. अनुभवाच्या व परीक्षणाच्या कसोटीस उतरेल तीच गोष्ट असल्या प्रकरणी खरी मानावी लागते." (केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. २०२).
वैद्यक व ज्योतिष हीं प्रत्यक्षनिष्ठ शास्त्रे झाली. पण व्याकरण, वेदार्थमीमांसा याहि बाबतीत, आमच्या शास्त्रांची वाढ प्राचीन काळींच खुंटली होती, आणि युरोपीय पंडितांनी ती बंद पडलेली परंपरा पुन्हा चालू केली, असें सांगून टिळकांनी त्यांचा गौरव केला आहे; आणि शेवटी एक व्यापक विधान केलें आहे की, "आमच्या