या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२ । केसरीची त्रिमूर्ति
गृहस्थ, पण टिळकांनी हिंदी स्वराज्य संघाचे त्यांना अध्यक्ष केलें. बॅ. जिना यांची आरंभी वृत्ति पूर्ण राष्ट्रीय होती. त्या वेळी टिळक त्यांना असाच मान देत.
संगीताच्या दृष्टान्तांत त्यांनी सांगितलेला विचार ते प्रत्यक्षांत कसा आणीत होते तें यावरून विशद होईल. राष्ट्रीय जीवनांतील सर्व तारा परस्परांना उपकारक होऊन सर्वातून संवादी असा एकच मधुर सूर निघावा ही त्यांची तळमळ होती.
या देशांतील सर्व वर्ण, सर्व जाति, सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व प्रांत यांतील गरीब, श्रीमंत, कष्टकरी, बुद्धिजीवी या सर्वांचा 'स्व'मध्ये समावेश करून राष्ट्र-तत्त्वावर त्यांची संघटना कोणीही, केव्हाही बांधलेली नव्हती. ती बांधणें हें टिळकांचें उद्दिष्ट होतें. हे उद्दिष्ट अभूतपूर्व असें होतें. त्यांनी तें कसें साधलें हें आता पाहावयाचें आहे.