स्व-राज्यांतील 'स्व'चा व्याप । २२१
'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हा मंत्र उच्चारतांना लोकमान्यांच्या मनांत 'स्व'चा केवढा व्याप होता, हें यावरून ध्यानांत येईल. स्व म्हणजे सर्व लोक किंवा प्रजा. म्हणजेच अखिल भरतखंड, सर्व राष्ट्र हा व्यापक अर्थ प्रत्येक भारतीयाच्या मनांत बिबविण्याचा, वाचेने, मनाने व कृतीने त्यांनी अहनिश प्रयत्न चालविला होता.
सर्व पंथ, सर्व धर्म
स्वतः टिळक हिंदु धर्माचे व त्यांतहि सनातन वैदिक पंथाचे अतिशय अभिमानी होते; पण लिंगायत, जैन, बौद्ध या पंथांचा त्यांनी कधीहि अनादर केला नाही. कर्नाटक प्रांताचे नेते गंगाधरराव देशपांडे ह्यांना त्यांनी एकदा मुद्दाम सांगितलें की, तुम्ही सार्वजनिक चळवळ कर्नाटक प्रांतांत करीत आहांत. तेथे लिंगायत लोक बरेच आहेत. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे लिंगायत लोकांच्या धर्म-ग्रंथांचा चांगला परिचय करून घेऊन, त्या धर्माच्या उदार तत्त्वांचा आदरपूर्वक अभ्यास करा. म्हणजे त्या धर्मांतील लोकांसंबंधाने आपला आदर वाढून आपल्याला त्यांची सहानुभूति मिळते, नाही तर विनाकारण गैरसमज होतो. जैनपंथाविषयी त्यांनी मुनि जिनविजय यांच्यापाशीं असाच आदरभाव व्यक्त केला होता. ते म्हणाले, जैन समाजाची सांपत्तिक स्थिति फार उत्तम आहे. तो समाज देशाच्या ज्ञानप्रसारक संस्थांना सहानुभूति दाखवून मदत करील तर देशकार्यांत फार बहुमोल मदत होईल. (आठवणी, खंड २ रा, पृ. २१, ४७). कोलंबो येथे 'बौद्ध धर्म व वैदिक धर्म' या विषयावर लोकमान्यांचें व्याख्यान झालें होतें. त्यांत त्यांनी बौद्ध धर्माविषयी असेच गौरवोद्गार काढले होते. ते म्हणाले, "बौद्ध धर्माने वैदिक धर्मांतील संन्यासाची कल्पना स्वीकारली, पण त्याबरोबरच संन्याशाने समाजांत राहून समाजसेवा करावी, कर्मयोगी व्हावें, अशी त्यास दिशा लावली. बौद्ध धर्मामुळे वैदिक धर्मांतील अनेक अनावश्यक आचारांची छाटछाट होऊन वैदिक धर्माचें स्वरूप जास्त शुद्ध व जोमदार झाले, हें मान्य केलेच पाहिजे."
हें हिंदु धर्मातील पंथाविषयी झालें. ख्रिश्चन व मुस्लिम या धर्मांविषयीहि लोकमान्यांची अशीच वृत्ति होती. त्यांच्या 'स्व' मध्ये त्यांचाहि समावेश होत होता. भरतभूमीला जो कोणी मातृभूमि मानील, येथल्या राष्ट्रपुरुषांची जो पूजा करील व या भूमीशीं जो एकनिष्ठ असेल तो टिळकांचा 'स्व' होता. बॅ. बॅप्टिस्टा व मौ. शौकतअल्ली यांनी सांगितलेल्या आठवणींवरून (खंड २रा, पृ. ५४७, ५७९) व टिळकांच्या कलकत्ता, अमरावती येथील भाषणांवरून हें निःसंदेह सिद्ध होईल.
अत्यंत शुद्ध अशा राष्ट्रीय वृत्तीची टिळक प्रारंभापासून कशी जोपासना करीत होते तें यावरून ध्यानांत येईल. धर्मभेद त्यांनी राष्ट्रीय वृत्तीच्या कधी आड येऊ दिला नाही. दादाभाई हे पारशी होते. पण त्यांची राष्ट्रसेवा पाहून त्यांनी निरंतर त्यांचा 'पितामह, महर्षि' असा गौरव केला. बॅ. जोसेफ बॅप्टिस्टा हे खिश्चन